तुळजापूर : तालुक्यातील सरडेवाडी येथे जुन्या वादातून एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या प्रकरणी सात जणांविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. 14 मार्च 2025 रोजी दुपारी 2.30 ते 2.45 च्या सुमारास सरडेवाडी गावातील सुबालाजी वसंत धुरगुडे यांच्या दुकानासमोर फिर्यादी शुभम जयकुमार धुरगुडे (वय 25, रा. सरडेवाडी) यांच्यावर आरोपींनी हल्ला केला. जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी तसेच लोखंडी रॉड, लोखंडी कत्ती, वेळूची काठी, कुऱ्हाडीचा दांडा आणि दगडाने मारहाण केली.
या हल्ल्यात शुभम धुरगुडे गंभीर जखमी झाले असून, आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात भाउसाहेब हरिदास सरडे, प्रदीप हरीदास सरडे, रमेश बब्रुवान नन्नवरे, साईराज रमेश नन्नवरे, दिलीप बब्रुवान नन्नवरे (रा. सरडेवाडी, ता. तुळजापूर) आणि प्रशांत तांबे (रा. कुंभारी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभम धुरगुडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 189(2), 191(2), 191(3), 190, 118(2), 118(1), 115(2), 352, 351(3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास तुळजापूर पोलीस करीत आहेत.