तुळजापूर : तालुक्यातील वडगाव (लाख) येथील आईसाहेब हॉटेलवर पाण्याच्या बाटलीवरून झालेल्या वादातून एका ग्राहकाला जीवे मारण्याच्या उद्देशाने तलवार आणि लोखंडी रॉडने जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना १६ मे २०२५ रोजी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घडली असून, याप्रकरणी विशाल अरुण जगताप (वय ३५, रा. वडगाव लाख) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संतोष दुधाभाते, गणेश भोसले (दोघे रा. वडगाव लाख, ता. तुळजापूर) आणि अन्य एका अनोळखी इसमाविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींपैकी संतोष दुधाभाते हा स्वतःला पत्रकार असल्याचे भासवून लोकांना फसवणूक करत असल्याची माहितीही समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विशाल जगताप हे १६ मे रोजी रात्री आईसाहेब हॉटेलवर गेले होते. यावेळी त्यांनी पाण्याची बाटली मागितली असता, आरोपी संतोष दुधाभाते, गणेश भोसले आणि त्यांच्यासोबत असलेल्या एका साथीदाराने त्यांना पाण्याची बाटली देण्यास नकार दिला. या क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. आरोपींनी जगताप यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. इतकेच नव्हे तर, जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने लोखंडी रॉडने त्यांच्या उजव्या पायावर जबर प्रहार केला आणि तलवारीने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले.
या घटनेनंतर विशाल जगताप यांनी १७ मे २०२५ रोजी रुग्णालयातून दिलेल्या वैद्यकीय जबाबानुसार, तुळजापूर पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०९ (गुन्ह्यास अपप्रेरणा देणे), ३३३ (लोकसेवकास जबर दुखापत करणे), ११५(२) (मृत्यू किंवा आजन्म कारावासाने दंडनीय असलेल्या गुन्ह्यास अपप्रेरणा देणे), ३५२ (गंभीर प्रकोपाशिवाय हमला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग करणे), ३(५) (विशिष्ट परिस्थितीत केलेला हल्ला) आणि शस्त्र अधिनियम कलम ४, २५ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
या प्रकरणातील एक आरोपी संतोष दुधाभाते हा स्वतःला पत्रकार असल्याचे सांगून लोकांना फसवत असल्याचे अनेक प्रकार यापूर्वीही घडले असल्याची चर्चा आहे. तो पत्रकारितेचा धाक दाखवून अनेक गैरकृत्ये करत असल्याची माहितीही समोर येत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आरोपींना अटक कऱण्यात आली आहे., अशी माहिती तुळजापूर पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे वडगाव लाख परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.