तुळजापूर: तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग जवळील कचरा डेपो समोर मंगळवारी दुपारी कार आणि टमटम यांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत.
कारमधील प्रवासी तुळजापूर येथून देवीचे दर्शन करून बिदरकडे जात होते, तर टमटममधील प्रवासी जेवळी येथून चिवरीच्या लक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी जात होते. अपघातात जखमी झालेल्यांना नळदुर्गच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघाताची कारणे शोधण्यास सुरुवात केली आहे.
सोलापूर-तुळजापूर महामार्गावर अपघात, मोटारसायकलस्वाराचा मृत्यू
तुळजापूर: सोलापूर-तुळजापूर महामार्गावर सिंदफळ बायपासजवळ एका भीषण अपघातात मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला. अनिल शेषेराव जाधव (वय ३८, रा. आतनुर, ता. जळकोट, जि. लातुर) असे मृताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव हे त्यांच्या मोटरसायकल (क्र. एमएच २४ बीवाय ७८५३) ने सोलापूरकडून तुळजापूरकडे जात असताना सिंदफळ बायपासजवळ मागून येणाऱ्या बसने (क्र. एमएच १३ डी क्यू ७४२८) त्यांच्या मोटरसायकलला जोराची धडक दिली. या अपघातात जाधव हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी मृताचे भाऊ गजानन शेषेराव जाधव यांच्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलिस ठाण्यात बसचालकाविरुद्ध भादंवि कलम २८१, १०६ सह कलम १८४ मोवाका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
नळदुर्गजवळ अपघात: महालक्ष्मी दर्शनाला जाणाऱ्या महिलेचा मृत्यू, पती जखमी
नळदुर्ग: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर नळदुर्गजवळ एका भीषण अपघातात महालक्ष्मी दर्शनाला जाणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला, तर तिचा पती जखमी झाला. प्रियंका राहुल दुधभाते (वय २४, रा. धनगरवाडी, ता. तुळजापूर) असे मृताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल दुधभाते हे त्यांच्या पत्नी प्रियंका यांच्यासह मोटरसायकलने (क्र. एमएच १३ ए के ८७४६) महालक्ष्मी देवदर्शनासाठी जात होते. नळदुर्गजवळ जानकी हॉस्पिटलसमोर मागून आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या होंडा कारने (क्र. टीएस ०७ टीआर ६३९१) त्यांच्या मोटरसायकलला जोराची धडक दिली. या अपघातात प्रियंका या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. राहुल दुधभाते हे किरकोळ जखमी झाले आहेत.
याप्रकरणी राहुल दुधभाते यांच्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलिस ठाण्यात कारचालकाविरुद्ध भादंवि कलम २८१, १२५(अ), १२५(ब), १०६ सह कलम १८४ मोवाका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.