धाराशिव – लातूर-उमरगा महामार्गावर सोमवारी संध्याकाळी भीषण अपघात झाला. उमरगा तालुक्यातील माडज पाटीजवळ भरधाव वेगात जाणाऱ्या बोलेरो पिकअपने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. जखमींवर उमरगा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताचा थरार
प्राथमिक माहितीनुसार, लातूरहून उमरग्याकडे जाणाऱ्या बोलेरो पिकअपने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील आकाश सूर्यकांत रामपुरे (२४) व दीपक गणेश रामपुरे (२६, दोघेही रा. मंगरुळ, ता. औसा, जि. लातूर) तसेच पिकअपमधील दिगंबर गिरजाप्पा कांबळे (६२, रा. येळी, ता. उमरगा) हे तिघे जागीच ठार झाले. तसेच मारुती विश्वनाथ रेड्डी (५२, रा. येळी, ता. उमरगा) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उमरगा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वाहतूक कोंडी व पोलिसांची कारवाई
अपघातानंतर लातूर-उमरगा रोडवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. मृतदेह उमरगा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
रस्ता बनला ‘मृत्यूचा सापळा’
लातूर-उमरगा महामार्गावर वारंवार अपघात घडत असून हा रस्ता मृत्यूचा सापळा बनल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाले असले तरी वेगमर्यादा नियंत्रणासाठी आवश्यक स्पीड ब्रेकर व दिशादर्शक फलक बसवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. प्रशासनाने या मार्गावर तातडीने सुरक्षाव्यवस्था मजबूत करण्याची गरज आहे.