उमरगा – उमरगा शहरात बँकेतून पैसे काढून दुचाकीच्या डिक्कीत ठेवले आणि काही वेळातच ते गायब झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्यंकट सुघ्रीव ब्याळे (वय ३९, रा.चिंचोली जहागीर, ता. उमरगा, जि. धाराशिव) यांनी ३१ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमधून १ लाख ४९ हजार रुपये काढले होते. काढलेली रक्कम त्यांनी त्यांच्या एमएच १२ एनसी ७९०७ क्रमांकाच्या मोटरसायकलच्या डिक्कीमध्ये ठेवली. बँकेतून बाहेर पडल्यानंतर काही वेळातच अज्ञात व्यक्तीने त्यांची डिक्कीतील रक्कम चोरून नेली.
या घटनेनंतर ब्याळे यांनी ५ फेब्रुवारी रोजी उमरगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली असून, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.
या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बँकेतून पैसे काढताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.