उमरगा : जुन्या भांडणाचा राग मनात धरून सात जणांच्या टोळक्याने एका २५ वर्षीय तरुणावर लोखंडी रॉड आणि काठीने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना उमरगा शहरात घडली आहे. हल्लेखोरांनी तरुणाच्या मोटरसायकलचीही तोडफोड करून नुकसान केले. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागेश शेषराव चांडकापुरे (वय २५, रा. धाकटीवाडी, ता. उमरगा) असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २८ जुलै रोजी मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास शहरातील शिवाजी कॉलेजजवळील ओंकार स्पोर्ट्स दुकानासमोर घडली. नागेश चांडकापुरे हे त्या ठिकाणी असताना, जुन्या वादाच्या कारणावरून आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवली. ओम बंडगर, सुरज कांबळे (दोघे रा. काळे प्लॉट, उमरगा), रितेश चव्हाण, हार्दिक बेडगे, ईश्वर जेवळे, हर्ष पटेल (सर्व रा. मुळज, ता. उमरगा) आणि शैलेश सुतार (रा. जकेकुर, ता. उमरगा) यांनी नागेश यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर लोखंडी रॉड आणि काठीने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. एवढ्यावरच न थांबता, आरोपींनी त्यांच्या मोटरसायकलची तोडफोड करून मोठे नुकसान केले.
या हल्ल्यानंतर नागेश चांडकापुरे यांनी ३० जुलै रोजी उमरगा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सातही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(२), ३५२, ३२४(४), १८९(२), १९१(२), १९१(३), १९० अन्वये गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.