उमरगा: उमरगा तालुक्यातील डिग्गी येथे एका २४ वर्षीय तरुणाचा मृतदेह गावच्या कडेच्या नाल्यात आढळल्याने खळबळ उडाली आहे. अजय गोपीचंद डिग्गीकर (वय २४) असे या मृत तरुणाचे नाव आहे. रसायनमिश्रित सिंधी व दारू पिऊन त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त होत आहे. या घटनेमुळे गावातील बेकायदेशीर आणि अवैद्य धंद्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अजय डिग्गीकर याचा मृतदेह गावच्या नाल्यात संशयास्पद अवस्थेत आढळून आला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर, गावात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविषयी नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गावातील या अवैध धंद्यांमुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असून गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळत असल्याचा आरोप होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे धंदे बंद करण्यासाठी उपोषणे आणि आंदोलने झाली. मात्र, तरीही ‘हफ्तेखोर’ प्रशासन, ग्रामपंचायत आणि काही स्वयंघोषित पुढारी यांच्या आशीर्वादाने हे धंदे खुलेआम सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे.
चिंताजनक बाब म्हणजे, गेल्या दोन ते तीन वर्षांतील हा अशा प्रकारचा आठवा बळी असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे, डिग्गी हे गाव विद्यमान आमदारांचे गाव असूनही, गावातच अशाप्रकारे खुलेआम अवैध धंदे सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ‘आमदारांच्या गावातच ही परिस्थिती असेल, तर बाकीच्या गावांचा विचार न केलेला बरा,’ अशा संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांमधून उमटत आहेत.
या घटनेवर ऍड. शीतल चव्हाण यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “डिग्गीत झालेला प्रकार हा नुसताच दुर्दैवी नसून लोकप्रतिनिधी व प्रशासनासाठी लज्जास्पद आहे. डिग्गीतील भेसळ, विषारी, अवैध दारुविक्री आणि अनेक तरुणांचे मृत्यू याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने गांभीर्याने पहावे. खरं तर, अवैध धंदे आणि वाढत्या गुन्हेगारीवरून माजी आमदाराविरुद्ध रान पेटवले होते, ज्याचा फायदा विद्यमान आमदार महोदयांना झाला. त्यामुळे आता या सर्व प्रकारांविरुद्ध जातीने लक्ष घालून त्यांना आळा घालणे हे त्यांचे नैतिक कर्तव्य आहे.”
“हे धंदे काही दिवस लक्ष दिल्यावर बंद होतात आणि वातावरण थंड होताच पुन्हा डोके वर काढतात, त्यामुळे सातत्यपूर्ण कारवाई आवश्यक आहे. सीमेलगतच्या उमरगा परिसरात असे प्रकार रोखण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून विशेष पथके नेमण्यासाठी आमदार महोदयांनी हा विषय सभागृहात मांडावा,” अशी मागणीही चव्हाण यांनी केली आहे.