उमरगा : उमरगा शहरातील बायपास रस्त्यावर माजी नगराध्यक्ष रज्जाक अत्तार यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर त्यांच्या पुतण्यावर तीन अज्ञात इसमांनी लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी घडली. या हल्ल्यात वसीम अत्तार हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे उमरगा शहरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी सुमारे ३.२० वाजण्याच्या सुमारास वसीम अत्तार हे पेट्रोल पंपासमोरील ठिकाणी बसले होते. यावेळी एका दुचाकीवरून तीन अज्ञात इसम तेथे आले. हल्लेखोरांनी चेहरा ओळखू येऊ नये यासाठी तोंड बांधले होते. तसेच त्यांनी हुडी घातली होती. त्यांच्या दुचाकीला नंबर प्लेट नसल्याचेही समोर आले आहे.
वसीम अत्तार यांना काही समजण्याच्या आतच तिघांनी त्यांच्यावर लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात वसीम अत्तार गंभीर जखमी झाले. हल्ल्यानंतर तिन्ही आरोपी दुचाकीवरून घटनास्थळावरून पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच उमरगा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हल्ल्याचा संपूर्ण प्रकार कैद झाला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्याच्या आधारे हल्लेखोरांची ओळख पटवून त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांच्या तपासानंतर या घटनेमागील कारण समोर येण्याची शक्यता आहे.





