उमरगा: शहरातील वाढती गुंडगिरी आणि दादागिरी रोखून गुंडांच्या टोळ्यांचा बंदोबस्त करावा, तसेच बांधकाम व्यावसायिक गोविंद दंडगुले यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याचा तपास स्वतंत्र यंत्रणेमार्फत करून मुख्य आरोपींना तात्काळ अटक करावी, या प्रमुख मागण्यांसाठी सोमवारी वडार समाज आणि विविध पक्ष-संघटनांच्या वतीने उमरगा शहरात मूक मोर्चा काढण्यात आला.
श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेला हा मोर्चा पोलीस ठाण्यावर नेण्यात आला. या मोर्चाला शहरातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि व्यापारी महासंघाने आपला पाठिंबा दर्शवत सक्रिय सहभाग नोंदवला.
पोलीस ठाण्याच्या आवारात मोर्चा पोहोचल्यानंतर त्याचे सभेत रूपांतर झाले. यावेळी आमदार प्रवीण स्वामी, शिवसेनेचे उपनेते व माजी आमदार ज्ञानराज चौगुले, युवा नेते किरण गायकवाड, भाजपचे कैलास शिंदे, शिवसेनेचे युवा नेते अजिंक्य पाटील, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते हरीश डावरे, वंचित बहुजन आघाडीचे रामभाऊ गायकवाड व शाहूराज माने, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस मधुकर यादव, व्यापारी महासंघाचे शिवप्रसाद लड्डा, मराठा सेवा संघाचे शांतकुमार मोरे आदींनी समयोचित भाषणे करून प्रशासनाचे लक्ष वेधले.
यानंतर, वडार समाज बांधवांच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार आणि पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, शहरात खुनी हल्ल्यांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. गोरगरिबांचे शोषण करून अवैध सावकारी आणि इतर अवैध धंद्यांच्या माध्यमातून गुंडांच्या टोळ्या तयार झाल्या आहेत. या टोळ्या १५ ते २५ वयोगटातील तरुणांना गुन्हेगारीकडे आकर्षित करत आहेत. या तरुणांचा वापर मारहाण करणे, दहशत पसरवणे यासाठी केला जात आहे. त्यांच्याकडे पिस्तूल, तलवारी, कुऱ्हाडी यांसारखी प्राणघातक शस्त्रे असून, त्यांचा वापर सर्रासपणे होत आहे. अवैध मार्गाने येणाऱ्या पैशामुळे हे तरुण व्यसनाधीन झाले असून, गुंड टोळ्यांचे म्होरके त्यांच्याकडून अनेक गैरकृत्ये करून घेत आहेत. या गुंडांच्या टोळ्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
या मोर्चात जिल्हा काँग्रेसचे विजय वाघमारे, भाजपा तालुकाध्यक्ष शहाजी पाटील, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रणधीर पवार, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अर्जुन बिराजदार, शिवसेना तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, माजी नगराध्यक्ष रजाक अत्तार, नानाराव भोसले, विजयकुमार नागणे, आप्पाराव गायकवाड, धीरज बेळंबकर, शहाजी मस्के, बाबा मस्के, अजय वाघमारे, विक्रम मस्के, बळीराम पवार, गोविंद पवार, तानाजी दंडगुले, बंडू पवार, राम धोत्रे, बसू घोडके, मारुती देवकर, विठ्ठल पवार, डॉ. रसूल शेख, रोहित पवार, दत्ता कुऱ्हाडे, नागेश पाथरुट, व्यंकट पवार यांच्यासह महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास भराटे, गंगाधर पूजरवाड, पांडुरंग कन्हेरे यांच्यासह पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.