उमरगा : उमरगा तालुक्यातील गुरुवाडी येथे एका ३२ वर्षीय तरुणाला सहा जणांच्या टोळक्याने घेरून स्टील पाईप, हंटर आणि दगडांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुण जखमी झाला असून, त्याला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुवाडी येथील रहिवासी अविनाश नाशीवंत लिंबारे (वय ३२) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी, ३० जुलै रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास गावातील महादेव मंदिराजवळ घडली. अविनाश लिंबारे हे मंदिराजवळ असताना आरोपींनी गैरकायदेशीर जमाव जमवून त्यांना अडवले.
यावेळी आरोपी महादेव राम गायकवाड, सुनिल गायकवाड, रमेश गायकवाड, सतिष गायकवाड, भिम गायकवाड आणि व्यंकट गायकवाड (सर्व रा. गुरुवाडी) यांनी अविनाश यांना शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपींनी स्टील पाईप, हंटर, लाकडी फळी आणि दगडांनी अविनाश यांना जबर मारहाण करून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली. हा हल्ला कोणत्या कारणातून झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या घटनेनंतर अविनाश लिंबारे यांनी उमरगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सहा आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेनुसार दंगल माजवणे, मारहाण करणे, आणि जीवे मारण्याची धमकी देणे या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.