उमरगा – तालुक्यातील एका गावात दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन दलित मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. आरोपीने पीडित मुलीला घरी जाऊन चुंबन देण्याचा प्रयत्न केला, शाळेत जाण्या-येण्याच्या वेळी पाठलाग केला आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.
पीडित मुलगी ही दहावीत शिकते आणि तिचे आई-वडील मजुरी करतात. आरोपी तरुणही त्याच गावातील असून तो कॉलेजमध्ये शिकतो. १८ जुलै २०२४ रोजी आरोपीने पीडित मुलीला घरी जाऊन चुंबन मागितले आणि तिचा हात ओढून चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. मुलीने विरोध केल्यावर आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपीने पीडित मुलीचा शाळेत जाण्या-येण्याच्या वेळी पाठलाग केला, जातीवाचक शिवीगाळ केली आणि तिला त्रास दिला.
२८ जानेवारी रोजी पीडित मुलगी सराव परीक्षेला गेली असताना आरोपीने पुन्हा तिचा पाठलाग केला आणि तिला उचलून नेण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे पीडित मुलगी घाबरली आणि तिने पोलिसात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोस्को कायदा, विनयभंग आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पोलीस उपविभागीय अधिकारी सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.