उमरगा – उमरगा शहरातील मुन्सी प्लॉट परिसरात एका ५३ वर्षीय व्यक्तीकडून १०,७८५ रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. शनिवारी (दि. १६) दुपारी ही कारवाई करण्यात आली असून, याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
कमल गोपीनाथ राठोड (वय ५३, रा. मुन्सी प्लॉट, उमरगा) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ ऑगस्ट रोजी दुपारी १२.२० च्या सुमारास मुन्सी प्लॉट परिसरात राठोड याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याची झडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे एका कॅरीबॅगमध्ये हिरवट रंगाचा, उग्र वास असलेला ७१९ ग्रॅम गांजा (पाने, बिया व काड्यांसह) आढळून आला.
याप्रकरणी, पोलिसांनी स्वतः सरकारतर्फे फिर्याद देऊन आरोपी कमल राठोड विरोधात गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमाच्या कलम ८ (क) व २०(ब) (ii) (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उमरगा पोलीस करत आहेत.