उमरगा : लातूर-उमरगा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या व्यक्तीस भरधाव दुचाकीने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माडज पाटी येथे रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या शामसुंदर कालिदास पाटील (वय ४२, रा. न्यू बालाजी नगर, उमरगा) यांना मोटरसायकल (क्रमांक MH-12 JF-3597) चालवणाऱ्या अज्ञात व्यक्तीने हायगतीने व निष्काळजीपणे दुचाकी चालवून धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या शामसुंदर पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या प्रकरणी त्यांची पत्नी बकुळा शामसुंदर पाटील (वय ३७) यांनी १ मार्च २०२५ रोजी उमरगा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, भारतीय दंड संहितेच्या कलम २८१, १०६(१) सह मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
कळंब : पार्किंग न करता उभ्या ट्रकला दुचाकीची धडक; युवकाचा मृत्यू
कळंब : निष्काळजीपणे व नियमांचे उल्लंघन करून रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकी धडकल्याने एका युवकाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी कळंब पोलिस ठाण्यात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर भास्कर लोहारा व त्याचा मित्र तुषार पोपळगट हे मोटरसायकल (क्रमांक MH-22 AB-5423) वरून जात होते. यावेळी कळंब ते ढोकी रस्त्यावर मराठा खानावळसमोर ट्रक (क्रमांक MH-12 DJ-4621) चालकाने ट्रक हायगतीने व निष्काळजीपणे थांबवला होता. दिशादर्शक फलक व पार्किंग लाईट न लावल्यानं रस्त्यावर उभ्या ट्रकचा अंदाज न आल्याने दुचाकी ट्रकला धडकली. या अपघातात सागर लोहारा गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी सतिश नारायण ढोणे (वय २८, रा. मंगरूळ, ता. कळंब) यांनी १ मार्च २०२५ रोजी फिर्याद दिली. त्यावरून कळंब पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम १०६(२), १२५(अ), १२५(ब) सह मोटार वाहन कायदा कलम १३४(अ), १३४(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.