वाशी : शेताचा बांध काढल्याचा जाब विचारल्याच्या रागातून एका ४६ वर्षीय व्यक्तीवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना वाशी तालुक्यातील पारा येथे घडली. या भयंकर हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी रविवारी (ता. २९) दोघांविरुद्ध वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पारा (ता. वाशी, जि. धाराशिव) येथील रहिवासी धनंजय दत्तात्रय भराटे (वय ४६) हे शनिवारी (ता. २८) ५.१५ वाजेच्या सुमारास सारोळाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून जात होते. सचिन भराटे यांच्या पत्र्याच्या शेडच्या पाठीमागे ते असताना गावातीलच राजेंद्र बाबुराव भराटे आणि बाबुराव सोपान भराटे हे दोघे तिथे आले.
‘शेताचा बांध काढल्याबद्दल का बोलतोस?’ अशी विचारणा करत या दोघांनी धनंजय यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. पाहता पाहता वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी आरोपींनी धनंजय यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच, सोबत आणलेल्या कुऱ्हाडीने त्यांच्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले.
या जीवघेण्या हल्ल्यात धनंजय भराटे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयात उपचारादरम्यान धनंजय भराटे यांनी रविवारी (ता. २९) पोलिसांना वैद्यकीय जबाब दिला. त्यांच्या या जबाबावरून वाशी पोलीस ठाण्यात राजेंद्र बाबुराव भराटे आणि बाबुराव सोपान भराटे (दोघे रा. पारा, ता. वाशी) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९, ११५(२), ३५१(२), ३५१(३), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
गावातीलच व्यक्तींवर अशा प्रकारे जीवघेणा हल्ला झाल्याने पारा परिसरात खळबळ उडाली असून, वाशी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.





