वाशी – शेतशिवारात वाट अडवून एका छत्तीस वर्षीय व्यक्तीला काठीने आणि लाथाबुक्यांनी मारहाण करून खिशातील दोन हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतल्याची घटना तालुक्यातील पिंपळगाव लिंगी येथे घडली आहे. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मनोज सुब्राव कोल्हे (वय ३६, रा. पिंपळगाव लिंगी, ता. वाशी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ११ ऑगस्ट रोजी दुपारी १२ ते १२:३० वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी मनोज कोल्हे हे पिंपळगाव लिंगी शिवारातील त्यांच्या शेतात असताना आरोपी रामकृष्ण शिवाली कोल्हे, दीपक शिवाजी कोल्हे आणि त्यांच्या अन्य एका साथीदाराने (सर्व रा. पिंपळगाव लिंगी) त्यांची वाट अडवली.
आरोपींनी मनोज कोल्हे यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी आणि काठीने मारहाण करून जखमी केले. त्यानंतर, आरोपींनी कोल्हे यांच्या खिशातील रोख २,००० रुपये जबरदस्तीने काढून घेतले आणि त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेनंतर मनोज कोल्हे यांनी तात्काळ वाशी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी रामकृष्ण कोल्हे, दीपक कोल्हे व अन्य एका अनोळखी इसमाविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार मारहाण, जबरी चोरी आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास वाशी पोलीस करत आहेत.