वाशी : वाशी तालुक्यातील सरमकुंडी रोडवर असलेल्या एका पेट्रोल पंपावर धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पेट्रोलचे पैसे मागितल्याच्या रागातून एका ग्राहकाने चक्क पिस्तुलसदृश ‘एअर गन’चा धाक दाखवून कर्मचाऱ्याला धमकावले आणि पैसे न देताच तेथून पळ काढला. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार दिनांक ७ मार्च २०२६ रोजी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास वाशी फाटा ते सरमकुंडी दरम्यान असलेल्या प्रताप पेट्रोल पंपावर हा प्रकार घडला. आरोपी दिनेश भगवान चव्हाण (रा. कोपरा, ता. अंबाजोगाई, जि. बीड; सध्या रा. पारगाव, ता. वाशी) हा आपल्या वाहनात पेट्रोल भरण्यासाठी पंपावर आला होता.
त्याने ९.१५ लिटर पेट्रोल भरले, ज्याची एकूण किंमत ९६४ रुपये झाली होती. पंप कर्मचारी तानाजी विष्णू भोरे (वय २४ वर्षे, रा. दहीफळ) यांनी पेट्रोलचे पैसे मागितले असता, आरोपीने पैसे देण्यास नकार दिला. इतकेच नव्हे तर, त्याने आपल्याकडील पिस्तुलसारखी दिसणारी ‘एअर गन’ काढून कर्मचाऱ्याला जीवे मारण्याचा धाक दाखवला आणि तिथून निघून गेला.
या घटनेनंतर घाबरलेल्या कर्मचाऱ्याने तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. फिर्यादी तानाजी भोरे यांनी रविवार दिनांक ८ मार्च २०२६ रोजी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी दिनेश चव्हाण याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(२), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
भरवस्तीत आणि पेट्रोल पंपावर घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वाशी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.






