महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीची नगरी – तुळजापूर! या पवित्र भूमीला काळवंडविणाऱ्या समाजविघातक कृत्यांनी सध्या शहराची ओळखच बदलून टाकली आहे. कोणतेही तीर्थक्षेत्र म्हणजे पावित्र्याचे प्रतीक असते. मात्र, तुळजापूरमध्ये गुन्हेगारीचा विळखा, ड्रग्जचा फैलाव आणि भ्रष्टाचाराची दलदल उभारून ठेवली आहे. धर्म आणि भक्तीच्या आच्छादनाखाली गुन्हेगारांनी आपले राज्य उभे केले. हे अपवित्र करणारे कोण? जबाबदार कोण? कोणत्या चेहऱ्यांनी आई भवानीच्या पवित्र नगरीला घाणेरड्या धंद्यांचे अड्डे बनवले?
तुळजापूरमध्ये वेश्या व्यवसाय, मटका, चक्री जुगार यांचे जाळे विणले गेले होते. हे धंदे राजरोसपणे सुरू होते आणि स्थानिक पोलिसांनी डोळे असूनही आंधळेपणा पत्करला होता. गुन्हेगारांचा वरदहस्त म्हणजे स्थानिक राजकारणी – नगरसेवक, माजी नगराध्यक्ष आणि सत्ता उपभोगणारे नेते! हाच सत्ताधार्यांचा दृष्टीकोन – गुन्हेगारांना पाठीशी घालून स्वतःच्या फायद्यासाठी त्यांचा वापर करणे.
पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांची बदली झाली आणि काय घडले? गुन्हेगारीचे हे सर्व अड्डे अचानक बंद झाले! म्हणजे स्पष्ट आहे – खांडेकरांच्या कार्यकाळात हे धंदे बेधडक सुरू होते. पोलिसांची भूमिका हतबल नव्हती, तर गुन्हेगारांना संरक्षण देणारी होती. पोलिसांनीच आपली जबाबदारी गुंडांच्या हातात सुपूर्द केली होती. मग आता विचारायला हवे – पोलिसांची जबाबदारी फक्त गणवेश धारण करण्यापुरतीच आहे का?
या गुन्हेगारी चक्रव्यूहात गुंड तयार झाले, टोळ्या उभ्या राहिल्या आणि त्या टोळ्या नेत्यांच्या आज्ञेप्रमाणे नाचू लागल्या. माजी नगराध्यक्ष, नगरसेवक आणि राजकीय नेत्यांच्या वरदहस्ताने गुंडांची फौज उभी राहिली. निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी अवैध मार्गाने पैसा कमवणे आणि मग भ्रष्टाचाराचे जोखड मांडणे – हेच त्यांचे उद्दिष्ट.
ड्रग्जने केला तुळजापूरचा अपमान
तुळजापूरमध्ये ड्रग्जचा विळखा एवढा घट्ट बसला की दोन हजारांपेक्षा अधिक तरुण त्यात ओढले गेले. मुंबईहून संगिता गोळे आणि तिचा पती वैभव गोळे ड्रग्ज पाठवत होते आणि विकणारे कोण तर विनोद उर्फ पिटू गंगणे – माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापू कणे, माजी सभापती शरद रामकृष्ण जमदाडे, स्वराज उर्फ पिनू सचिन तेलंग आदी. पोलिसांनी केवळ ३५ जणांवर गुन्हे दाखल केले; त्यापैकी २१ जण फरार आहेत. फरार आरोपींमध्ये माजी नगराध्यक्षांचे हस्तक, नगरसेवकांचे जवळचे आणि ड्रग्ज विक्रेते यांचा समावेश आहे. पोलिसांनी अजूनही या प्रकरणाचा सखोल तपास केलेला नाही.
तुळजापूरच्या धार्मिक ओळखीला काळिमा फासणारे हे घटक आजही मोकाट आहेत. पोलिसांनी गुन्हेगारांना संरक्षण दिले, नेत्यांनी गुंड तयार केले आणि पत्रकारांनी मौन धारण केले. वृत्तपत्रातील पानभर जाहिरातींनी पत्रकारांचा आवाज दाबला गेला.
आता प्रश्न हा आहे की, सरकार आणि प्रशासन काय करत आहे? धर्माच्या नावाने मतं मागणारे नेते आता कुठे आहेत? पोलिसांनी गुन्हेगारांना मकोकाच्या (MCOCA) कचाट्यात का घेतले नाही? नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) या प्रकरणाचा तातडीने तपास केला पाहिजे. अन्यथा तुळजापूर नगरी गुन्हेगारी आणि ड्रग्जच्या विळख्यातून कधीही मुक्त होणार नाही.
तुळजापूरच्या जनतेने आता या भ्रष्ट राजकारणी आणि पोलिसांच्या विरोधात ठाम भूमिका घेणे गरजेचे आहे. माता तुळजाभवानीची नगरी भ्रष्टाचाराने आणि गुन्हेगारीने विटाळली आहे. जनतेने आवाज बुलंद करून गुन्हेगारांना आणि त्यांच्या पाठीशी असलेल्या नेत्यांना उघडे पाडले पाहिजे.
आई भवानीच्या नावाने ही नगरी पुन्हा एकदा पवित्र करण्यासाठी लोकांना आता आवाज उठवावा लागेल, अन्यथा गुन्हेगारीचे हे राक्षस तुळजापूरच्या पवित्र मातीला कायमचे अपवित्र करून टाकतील.
– बोरूबहाद्दर