धाराशिव : बीडमधील मसाजोग येथे पवनचक्कीच्या वादातून झालेल्या हत्येच्या घटनेनंतर आता धाराशिव जिल्ह्यातही पवनचक्की गुंडांच्या दहशतीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तुळजापूर तालुक्यातील जवळगा (मेसाई ) गावात रिन्यू कंपनीच्या पवनचक्की उभारणीच्या कामात शेतकऱ्यांची परवानगी न घेतल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी काम थांबवले. यामुळे संतप्त झालेल्या ठेकेदाराने शेतकऱ्यांना धमकावण्यासाठी गुंडांचा वापर केला.
काळ्या रंगाच्या २० स्कॉर्पिओ गाड्यांमधून आलेल्या ४० ते ५० बाऊन्सरनी जवळगा गावात दहशत माजवली. गावातील लोकांना शिवीगाळ करत धमकावण्यात आले. जवळपास दोन तास हा प्रकार सुरू होता. गावकऱ्यांनी पोलिसांना संपर्क साधला मात्र पोलीस घटनास्थळी पोहोचले नाहीत. अखेर तुळजापूरचे भाजपा नेते विशाल रोचकरी यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला.
याप्रकरणी कंपनीविरोधात तुळजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असली तरी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. पोलिसांच्या मदतीनेच पवनचक्की कंपनीचे गुंड दहशत निर्माण करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेने पुन्हा एकदा पवनचक्की प्रकल्पांच्या नावाखाली सुरू असलेल्या गुंडगिरीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली नाही तर आणखी एक मसाजोग प्रकार घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.