वाशी : जमिनीच्या वाटणीच्या वादातून एका ३५ वर्षीय महिलेला काठी आणि कुऱ्हाडीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना वाशी तालुक्यातील शेलगाव येथे घडली आहे. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेलगाव येथील रहिवासी असलेल्या वर्षा काशिनाथ भैरट (वय ३५) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, सुरेश रामभाऊ भैरट, रामभाऊ तुकाराम भैरट, जिजाबाई जगन्नाथ भैरट (सर्व रा. शेलगाव, ता. वाशी) आणि तात्यासाहेब दादाराव शिंगटे (रा. दहीफळ, ता. वाशी) यांनी ५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास वर्षा भैरट यांना ‘तू भारी वाटणी घेतलीस आणि आम्हाला हलकी वाटणी दिली’ असे म्हणत शिवीगाळ केली.
त्यानंतर आरोपींनी संगनमत करून वर्षा यांना लाथाबुक्क्यांनी, काठीने आणि कुऱ्हाडीने मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच, त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली.
या घटनेनंतर वर्षा भैरट यांनी ७ ऑगस्ट २०२५ रोजी वाशी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सुरेश भैरट, रामभाऊ भैरट, जिजाबाई भैरट आणि तात्यासाहेब शिंगटे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.