धाराशिव: शहरातील आठवडी बाजार परिसरात रिक्षा भाड्यावरून झालेल्या वादातून एका महिलेने ३५ वर्षीय पुरूषाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगीता शिवाजी पवार असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव असून ती भोसले हायस्कूल परिसरात राहते. विजय लक्ष्मण आगाशे (३५) यांनी पवार यांना रिक्षाचे भाडे देण्यास नकार दिल्याने वाद निर्माण झाला. या वादातून पवार यांनी आगाशे यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्यांना दगडाने मारहाण करून जखमी केले. एवढेच नाही तर पवार यांनी आगाशे यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
आगाशे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पवार यांच्याविरुद्ध भादंवि कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलांना सायकल पाहण्यास मज्जाव केल्याने मारहाण
वाशी – वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलावर क्रूर मारहाण केल्याची घटना घडली आहे. दिनेश चंद्रकांत पाटील नावाच्या व्यक्तीने जालिंदर पवार यांचा मुलगा कृष्णा याला सायकलचा खेळ पाहण्यास मज्जाव केल्याने ही घटना घडली.
दिनेश पाटील याने १९ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास बोरगाव धनेश्वरी येथील मारुती मंदिराजवळ कृष्णा पवार याला सायकलचा खेळ पाहण्यास मज्जाव केला. “माझ्या पुढे का बसलास?” असे म्हणत त्याने कृष्णा याला लाथाबुक्यांनी व काठीने मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकीही दिली.
या घटनेमुळे जखमी झालेल्या कृष्णाच्या वडिलांनी जालिंदर पवार यांनी वाशी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दिनेश पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर भादंवि कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.