धाराशिव शहरातील वाहतूक पोलिसांनी शहराची वाहतूक व्यवस्थाच एका विनोदाच्या थराला नेली आहे. शहरात कुठेही सिग्नल नाहीत, आणि जेथे होते, तिथेही ते बंद आहेत. पण पोलिसांना त्याची काहीच चिंता नाही, कारण त्यांचे लक्ष सिग्नलपेक्षा चहा टपऱ्या आणि पानाच्या दुकानांवर अधिक असते. चौकात उभं राहून वाहतूक नियंत्रित करण्याऐवजी ते टपरीवर पिचकाऱ्या मारण्यात गुंग असतात.
वाहनांच्या परवान्यांची चौकशी करणं सोडाच, पण टोळकं बनवून तिघे-चौघे एकाच दुचाकीवरून निघाले तरी पोलिसांचं लक्ष फक्त गरीब वाहनचालकांकडेच असतं. “गरीब दिसला की धमकवा, चिरीमिरी उकळा” हीच त्यांच्या कामाची नवी नीती झाली आहे.
शहरात नियमबाह्य गाड्या, फॅन्सची नेमप्लेट्स, आणि हेल्मेटविना गाडी चालवणाऱ्यांचं प्रमाण वाढत असताना, धाराशिवचे वाहतूक पोलीस मात्र याकडे कानाडोळा करत आहेत. कदाचित, ‘नेमप्लेट वाचण्यापेक्षा पानाची चव चांगली’ हा त्यांचा नवीन सिद्धांत असावा.
फिक्स पॉईंटवर पोलिसांना कधीच दिसलं जात नाही. उलट, त्यांच्या नियमित जागा ठरलेल्या आहेत – चहाची टपरी, भेळची गाडी, आणि गप्पा मारण्यासाठीचा कोपरा. चौकात वाहतूक कोंडी होत असताना, पोलिसांना मात्र “पिचकाऱ्या स्पर्धा” जिंकण्यात अधिक रस असतो.
शहरवासीयांच्या म्हणण्यानुसार, “आमच्या रस्त्यांवर खड्डे आहेत, आणि पोलिसांच्या कामात खड्डा आहे.” धाराशिव शहरात वाहतूक पोलिसांची ही कामगिरी पाहून लोकांना आता सिग्नलची आवश्यकता वाटत नाही, कारण सिग्नल जरी बंद असले, तरी खड्डे आणि पिचकाऱ्या व्यवस्था सांभाळत आहेत.
आता सवाल असा आहे, या वाहतूक पोलिसांना त्यांच्या पोशाखासोबत एक ‘चहाचा कप’ आणि ‘पिचकारीचा सेट’ दिला तर चालेल का? कारण काम सोडून या गोष्टींत ते पूर्ण प्रोफेशनल झाले आहेत!