तुळजापूर – श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी जात असलेल्या एका ५० वर्षीय महिलेला दोन अनोळखी इसमांनी बोलण्यात गुंतवून तिचे ८१ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना तुळजापुरात घडली आहे. ही घटना शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात शनिवारी, १२ एप्रिल २०२५ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.
याप्रकरणी केसरबाई प्रभाकर पांडव (वय ५०, रा. चाटे पाटील वस्ती, जुना देगाव नाका, सोलापूर) यांनी १३ एप्रिल २०२५ रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केसरबाई पांडव या १२ एप्रिल रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास श्री तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी जात होत्या. त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आल्या असता, दोन अनोळखी इसमांनी त्यांना बोलावून घेतले. त्यांनी केसरबाई यांना बोलण्यात गुंतवून ठेवले आणि अचानक त्यांच्या गळ्यातील सुमारे ९ ग्रॅम वजनाचे, अंदाजे ८१,००० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून घेतले.
जेव्हा केसरबाई यांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपींनी “आरडा ओरड केली तर तुला खल्लास करू” अशी जीवे मारण्याची धमकी दिली आणि तेथून पळ काढला.
केसरबाई पांडव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलिसांनी दोन अनोळखी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.