मुरुम : ट्रॅक्टर लावण्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या एका ३६ वर्षीय महिलेच्या तोंडावर दगडाने मारून तिचे पाच दात पाडल्याची धक्कादायक घटना उमरगा तालुक्यातील येणेगूर येथे घडली आहे. याप्रकरणी मुरुम पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मदिना महमद भालके (वय ३६, रा. येणेगूर, ता. उमरगा, जि. धाराशिव) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. १ एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास मदिना यांचे पती आणि गावातीलच आरोपी अहमद युसुफ भालके यांच्यात ट्रॅक्टर लावण्याच्या कारणावरून वाद झाला होता. या वादाचे रूपांतर नंतर मोठ्या भांडणात झाले.
आरोपी अहमद याने मदिना यांच्या पतीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. आपल्या पतीला मारहाण होत असल्याचे पाहून मदिना या भांडण सोडवण्यासाठी व मध्यस्थी करण्यासाठी मध्ये गेल्या. मात्र, संतापाच्या भरात आरोपी अहमद भालके याने मदिना यांच्या तोंडावर थेट दगडाने प्रहार केला. या अमानुष मारहाणीत मदिना यांचे पाच दात तुटून पडले असून त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.
या घटनेनंतर मदिना भालके यांनी ४ एप्रिल रोजी मुरुम पोलीस ठाण्यात जाऊन रीतसर तक्रार नोंदवली. त्यांच्या फिर्यादीवरून मुरुम पोलिसांनी आरोपी अहमद युसुफ भालके याच्याविरुद्ध नवीन फौजदारी कायदा म्हणजेच भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११७(२), ११५(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मुरुम पोलीस करत आहेत.





