येरमाळा – वाशी तालुक्यातील खामसवाडी येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तीन आरोपींना येरमाळा पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना दि. २४ मार्च २०२५ रोजी रात्री ९.१० वा. घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नामे बबलु उर्फ राहुल अर्जुन काळे (वय २८ वर्षे), धनाजी सुरेश शिंदे (वय २१ वर्षे) दोघे रा. खामसवाडी, ता. वाशी, जि. धाराशिव आणि संजय काळे यांचा मेहुणा बबलु व त्यांचा एक साथीदार रा. खामकरवाडी, ता. वाशी हे सीड फॉर्ममध्ये जाणाऱ्या कच्च्या रस्त्यालगत दुधाळवाडी पाटी येथे दरोड्याच्या तयारीसाठी एकत्र आले होते.
दरोडा टाकण्यासाठी आरोपींकडे एक लोखंडी कटावणी, कोयता, लोखंडी जॅक, स्क्रू ड्रायव्हर, एक पोको कंपनीचा मोबाईल फोन आणि बजाज कंपनीची पल्सर मोटरसायकल (क्र. एमएच २५ बीसी ७७५९) असा एकूण ९८,८०० रुपये किमतीचे साहित्य आढळले.
पोलिस अंमलदार सागर वसंतराव कांबळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरून येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३१०(४), ३१०(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे दरोडा टाकण्याचा कट उधळण्यात पोलिसांना यश आले असून, पुढील तपास सुरू आहे.