येरमाळा – आर्थिक फायद्यासाठी स्वतःच्या राहत्या घरामागेच गांजाची अवैध लागवड करणाऱ्या एका ६० वर्षीय वृद्धावर येरमाळा पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल १ लाख ८४ हजार रुपये किमतीचा ९ किलो २०० ग्रॅम ओला गांजा जप्त केला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. भावसाहेब प्रल्हाद राऊत असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, येरमाळा पोलीस स्टेशनचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक भालेराव यांना २१ सप्टेंबर २०२५ रोजी एका गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती. त्यानुसार, येरमाळा येथील भावसाहेब राऊत हे आपल्या घरामागील मोकळ्या जागेत बेकायदेशीरपणे गांजाची लागवड करून त्याचे संगोपन करत होते. या माहितीच्या आधारे, पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना आणि उपविभागीय पोलीस अधिकारी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली येरमाळा पोलिसांनी सापळा रचून राऊत यांच्या घरावर छापा टाकला.
छाप्यादरम्यान, घराच्या पाठीमागे लावलेली ओलसर गांजाची झाडे आढळून आली. पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण ९ किलो २०० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला, ज्याची अंदाजित किंमत १,८४,००० रुपये आहे.
याप्रकरणी आरोपी भावसाहेब प्रल्हाद राऊत (वय ६० वर्षे) याच्या विरोधात येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक २६२/२०२५ नुसार एन.डी.पी.एस. कायद्याच्या कलम २० (ब), (IIB), ८ (सी), आणि २० (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई सहायक पोलीस निरीक्षक भालेराव, पोलीस उपनिरीक्षक भोजगुडे, आवारे, पोलीस हेडकॉन्स्टेबल शेख, तिगाडे, पोलीस नाईक सय्यद, पोलीस अंमलदार पठाण, अमोल जाधव आणि चालक दराडे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.