येरमाळा – कळंब तालुक्यातील येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीच्या यात्रेत पालखी दर्शनासाठी गेलेल्या एका ६२ वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील सुमारे ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन लंपास केले. ही घटना १३ एप्रिल २०२५ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास येरमाळा येथील चुन्याच्या मैदानात घडली. याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून येरमाळा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी सुशीला जिवन कवडे (वय ६२ वर्षे, रा. येरमाळा, ता. कळंब) या १३ एप्रिल रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीच्या यात्रेत चुन्याच्या मैदानात पालखीच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने फिर्यादी सुशीला कवडे यांच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाचे, अंदाजे ६०,००० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले.
घडलेला प्रकार लक्षात आल्यानंतर सुशीला कवडे यांनी १४ एप्रिल २०२५ रोजी येरमाळा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये चोरीचा गुन्हा नोंदवला आहे. येरमाळा पोलीस अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहेत. यात्रेतील गर्दीत चोरांपासून सावध राहण्याचे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.