धाराशिव: येडशी येथील ३३ वर्षीय स्नेहल सुरज मोहिते या तरुणीने १९ नोव्हेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. लातूर जिल्ह्यातील मुरुड येथील फिरोज बाबू शेख आणि अरुण रामराव मोरे या दोघांनी स्नेहल हिचे फोटो तिच्या नातेवाईकांना पाठवून ते व्हायरल करण्याची धमकी दिल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे तिचे पती सुरज मोहिते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सांगितले.
आरोपींनी सतत शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याने स्नेहलने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या पतीने केला आहे. या प्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात भादंवि कलम १०८, ३५१(१), ३(५) सह ६६(ई), ६७ आयटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार; तरुणावर गुन्हा दाखल
तुळजापूर: तालुक्यातील एका गावात २१ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. १ नोव्हेंबर २०२३ ते १४ सप्टेंबर २०२४ या कालावधीत आरोपीने पीडित तरुणीला वेगवेगळ्या तीन ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात आरोपी तरुणावर भादंवि कलम ६४(२)(एम) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणीचे नाव आणि गाव हे गोपनीय ठेवण्यात आले आहे.