मुरुम – केसरजवळगा येथे एका तरुणाला गावात फार बोलतोस म्हणून तीन जणांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे.
शैलेश सुनिल लोखंडे (वय 25, रा. केसरजवळगा) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी विशाल प्रल्हाद गायकवाड, दशरथ प्रल्हाद गायकवाड आणि पप्पु परमेश्वर गायकवाड (सर्व रा. भिमनगर, केसरजवळगा) यांच्या विरोधात मुरुम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 जानेवारी 2025 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास बिरुदेव मंदिरासमोरील बेंळब ते केसरजवळगा जाणाऱ्या रस्त्यावर ही घटना घडली. आरोपींनी शैलेश लोखंडे यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण केली. तसेच त्यांना ढकलून देऊन जखमी केले आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी शैलेश लोखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुरुम पोलीस ठाण्यात भादंवि कलम 118(1), 115(2), 352, 351(2), 351(3), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.