कळंब: शेत रस्त्याच्या जुन्या कारणावरून एका तरुणाला आणि त्याच्या आई-वडिलांना कुऱ्हाडीच्या दांड्याने जबर मारहाण करण्यात आली. या हाणामारीत फिर्यादीच्या आईच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण तोडून नेल्याची धक्कादायक घटना कळंब तालुक्यातील शेळका धानोरा येथे घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १४ डिसेंबर २०२५ रोजी शेळका धानोरा शिवारातील गट नं. १७६ मध्ये घडली. फिर्यादी अभिजीत मेघनाथ शेळके (वय ३१, रा. शेळका धानोरा) आणि आरोपींमध्ये शेतात जाण्याच्या रस्त्यावरून वाद आहेत. याच कारणावरून आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून अभिजीत यांना शिवीगाळ केली तसेच लाथाबुक्यांनी आणि कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण करून जखमी केले.
वाद सोडवण्यासाठी आलेले फिर्यादीचे आई-वडील यांनाही आरोपींनी मारहाण केली. यावेळी झटापटीत आरोपींनी फिर्यादीच्या आईच्या गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे गंठण (किंमत अंदाजे ५०,००० रुपये) तोडून नेले. तसेच, “या रस्त्यावरून जायचे नाही,” असे धमकावत जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी अभिजीत शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कळंब पोलीस ठाण्यात आरोपी प्रभाकर बब्रुवान शेळके, उमा प्रभाकर शेळके, बाळासाहेब बब्रुवान शेळके आणि भैरु नामदेव टेळे (सर्व रा. शेळका धानोरा) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११९(१), ११८(१), १८९(२), १८९(४), १९१(२), १९१(३), १९०, ११५(२), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






