वाशी – तालुक्यातील ईट येथील खोपेश्वर यात्रेदरम्यान ज्यूस पिण्यासाठी बसलेल्या एका तरुणावर सहा जणांनी मिळून जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याची सोन्याची अंगठीही हिसकावून घेण्यात आली. ही घटना ९ एप्रिल २०२५ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी वेदांत काकासाहेब घुमरे (वय २२, रा. पारगाव घुमरा, ता. पाटोदा, जि. बीड) यांनी दिलेल्या वैद्यकीय जबाबानुसार १३ एप्रिल २०२५ रोजी वाशी पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी वेदांत घुमरे हे ९ एप्रिलच्या रात्री ईट येथील खोपेश्वर यात्रेतील एका ज्यूस बारसमोर ज्यूस पिण्यासाठी बसले होते. त्यावेळी आरोपी शंभुराजे सुबराव चव्हाण, सुभाष केशव चव्हाण, अक्षय खामकर, सचिन शिंदे (सर्व रा. ईट, ता. भुम, जि. धाराशिव), ऋषीकेश शंकर प्रभत (रा. चांदवड, ता. भुम, जि. धाराशिव) आणि इतर दोन अनोळखी इसमांनी तिथे येऊन गैरकायदेशीर जमाव जमवला.
आरोपींनी वेदांत यांना, “तू लय स्टाईल मारायला लागला आहेस, तुझा माज उतरवतो,” असे म्हणत शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला चढवला. त्यांनी वेदांत यांना लाथाबुक्क्यांनी, लोखंडी रॉडने, खिळे असलेल्या लाकडी पट्टीने आणि दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले. यावेळी वेदांत यांच्या मित्रांनाही आरोपींनी मारहाण करून जखमी केले.
यानंतर आरोपींनी लाईट बंद करून अंधाराचा फायदा घेतला आणि फिर्यादी वेदांत यांच्या हातातील सुमारे पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी जबरदस्तीने हिसकावून घेतली. तसेच, त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेनंतर वेदांत घुमरे यांनी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरून वाशी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०९, ११८(१), ३५१(२)(३), ११९(१), १८९(२), १९१(२)(३), १९० अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.