धाराशिव – इंस्टाग्राम स्टोरीवर हसण्याची इमोजी (प्रतिक्रिया) का टाकली, या क्षुल्लक कारणावरून एका तरुणाला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना धाराशिव तालुक्यातील भिकार सारोळा येथे घडली आहे. याप्रकरणी पीडित तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून ढोकी पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नारायण अंगद मुळे (वय २५, रा. भिकारसारोळा, ता. जि. धाराशिव) यांनी ढोकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, मंगळवार, दिनांक १५ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास भिकारसारोळा गावातील शिवाजी चौकात ही घटना घडली. आरोपी प्रणव विठ्ठल मेदणे (रा. भिकार सारोळा) याने, फिर्यादी नारायण मुळे यांना ‘माझ्या इंन्स्टाग्राम स्टोरीला हसण्याचा सिम्बॉल/ईमोजी का टाकला?’ असे म्हणत जाब विचारला.
याच कारणावरून आरोपी प्रणव मेदणे याने फिर्यादी नारायण मुळे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि नंतर लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण केली. या मारहाणीत नारायण मुळे गंभीर जखमी झाले.
घटनेनंतर दोन दिवसांनी, म्हणजेच गुरुवार, दि. १७ एप्रिल २०२५ रोजी, नारायण मुळे यांनी ढोकी पोलीस ठाण्यात धाव घेत प्रणव मेदणे विरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी या फिर्यादीवरून आरोपी प्रणव मेदणे विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११७, ११८(१), ११५ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. यामध्ये मारहाण करून दुखापत करणे आणि गंभीर दुखापत करणे अशा आरोपांचा समावेश आहे.
ढोकी पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. सोशल मीडियावरील एका प्रतिक्रियेवरून थेट मारहाणीपर्यंत प्रकरण पोहोचल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.