उमरगा : गुंजोटी येथे धक्का लागण्याच्या किरकोळ कारणावरून एका तरुणावर लोखंडी पाईप, हंटर काठी आणि पट्ट्याने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. या प्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरण उर्फ धिरज सिध्दाप्पा देशमुख (वय 24, रा. बसवेश्वर चौक, गुंजोटी) या तरुणावर 6 सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास गुंजोटी बाहेरपेठ येथे हल्ला करण्यात आला. एजाज अब्दुल काजी, आझर बाबर पटेल, जुनेद इमामोद्दीन उमापुरे, हुसेन पटेल, ख्वाजा शेख, हाजी हताळे, आयुब जावेद मोजणीदार, तक्की मुजावर, हाजी मुनवर ख्वाजा शेख, नदीम नासीर मुजावर, इस्माईल हुसने सौदागर आणि हुसेन पिरजादे या 12 जणांनी मिळून शरणवर हा हल्ला केला.
या घटनेनंतर शरण देशमुख यांनी 10 सप्टेंबर रोजी उमरगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच, लोखंडी पाईप, हंटर काठी आणि पट्ट्याने मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केले. या हल्ल्यात शरण यांच्या डोक्याला आणि शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाल्या आहेत.
पोलिसांनी या प्रकरणी आरोपींविरुद्ध भा.न्या.सं. कलम 189 (2), 191(2),191(3), 190, 118(1), 115(2), 352, 351(2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अद्याप फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.