तुळजापूर : शहरातील गवते प्लॉटींग परिसरात मंगळवारी (दि. २५) दुपारी मायलेकींनी एकाच दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
आत्महत्या करणाऱ्या महिलांचा ओळख पटली असून, रत्नमाला संजय पवार (वय ४५, रा. करंजे, ता. करमाळा, ह.मु. तुळजापूर) आणि त्यांची विवाहित मुलगी प्रतीक्षा तुषार पाटील (वय २३, रा. सापटने, ता. टेंभुर्णी) अशी मृत मायलेकींची नावे आहेत. रत्नमाला पवार या शहरातील प्रतिष्ठित शाळेच्या मुख्याध्यापकाच्या पत्नी आहेत, तर प्रतीक्षा हिचे लग्न अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच झाले होते.
प्रतीक्षा हिचे लग्न सहा महिन्यांपूर्वीच झाले होते. गुढीपाडवा सणानिमित्त ती माहेरी आली होती. दोघींनी घराच्या आतून कडी लावून नायलॉनच्या एकाच दोरीने गळफास घेतला. घटनास्थळी पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे, उपनिरीक्षक विजय थोटे, तपास अंमलदार शिखारे, अरुण शिरगिरे आणि प्रमोद रोटे यांनी भेट दिली आणि तपासकार्य सुरू केले.
शवविच्छेदनानंतर मंगळवारी रात्री उशिरा करंजे (ता. करमाळा) येथे मायलेकींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट होण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.