तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवघ्या एका वाक्यात विषय संपवला. आज (शनिवार) सकाळी तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना टाळण्याचा प्रयत्न केला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी देवीचे मनोभावे दर्शन घेतले आणि मंदिराच्या नूतनीकरणाचे काम पाहिले. मंदिराच्या जुनेरूप पुनर्स्थापनेसाठी सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी विकास आराखडा संदर्भात बैठक घेतली आणि तत्वता मान्यता दिली.
मात्र, तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणावर विचारणा करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अवघ्या एका वाक्यात विषय संपवला – “कारवाई सुरु आहे आणि कुणाला सोडणार नाही.” परंतु, या प्रकरणातील गंभीर तथ्ये लक्षात घेतल्यास मुख्यमंत्र्यांची ही प्रतिक्रिया फारच उथळ वाटते.
तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात आतापर्यंत ३५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी ४ जणांना अटक करण्यात आले असून, १० जण तुरुंगात आहेत. तथापि, २१ जण अद्याप फरार आहेत. विशेष म्हणजे फरार आरोपींच्या यादीत भाजपाशी संबंधित
स्थानिक नेत्यांचा समावेश आहे:
- विनोद उर्फ पिटू गंगणे – माजी नगराध्यक्ष पती
- चंद्रकांत उर्फ बापू कणे – माजी नगराध्यक्ष, तुळजापूर
- शरद रामकृष्ण जमदाडे – माजी सभापती
फडणवीस साहेब,तुळजापूर नगरी ड्रग्जमुक्त करा
तुळजापूर विकासासाठी १८६६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून विकास आराखड्याला गती देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मंदिर परिसराच्या विकासासाठी जागतिक दर्जाच्या सुविधांची यादी मांडण्यात आली. मात्र, या गजबजलेल्या धार्मिक स्थळाला एका महत्त्वाच्या समस्येने ग्रासले आहे – ड्रग्ज आणि गुंडगिरी.
मुख्यमंत्री साहेब, विकास आराखड्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची घोषणा तर केलीत, पण तुळजापूर नगरीला ड्रग्ज मुक्त करण्याच्या दिशेने ठोस पावले उचलाल का?
तुळजाभवानी मातेच्या चरणी लाखो भाविक नतमस्तक होतात, पण या पवित्र नगरीत काही अराजक प्रवृत्ती आणि ड्रग्जचा विळखा वाढतो आहे.
विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्याची गरज
तुळजापूर नगरीतील अवैध धंदे आणि ड्रग्जचा सुळसुळाट रोखण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्याची मागणी होत आहे. या पवित्र स्थळाची प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी स्थानिक पोलीस व यंत्रणा पुरेशी ठरत नाही, त्यामुळे एसआयटीद्वारे ड्रग्ज तस्करांचा आणि माफियांचा छडा लावावा.
गुंडगिरीला चाप बसवा
तुळजापूर शहरातील गुंडगिरी आणि अवैध धंदे बंद करण्यासाठी कठोर उपाययोजना हवी आहे. दोषींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) लागू करून गुंडगिरीला कायमचा चाप बसवावा.
अवैध धंद्यांत सहभागी असणाऱ्यांना हद्दपार करून भाविकांना सुरक्षित आणि निर्मळ वातावरण मिळवून द्यावे.
तुळजापूरच्या प्रतिष्ठेचा सवाल
तुळजापूर हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे, परंतु ड्रग्ज आणि गुंडगिरीमुळे भाविकांचा आत्मविश्वास ढळतो आहे. विकास कामांबरोबरच या धार्मिक नगरीच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्या.
फडणवीस साहेब, तुळजापूरचा कायापालट करण्यासाठी ड्रग्जमुक्ती आणि गुंडमुक्ती हा पहिला टप्पा असावा.
तुळजाभवानी मातेच्या चरणी नतमस्तक होताना या पवित्र नगरीला गुंडगिरी आणि ड्रग्जमुक्त करण्याचे वचनही द्या.