तुळजापूर – तालुक्यातील इटकळ येथील रहिवासी सौ. महानंदा सुरेश राठोड यांनी आपल्या शेतजमिनीतून (सर्व्हे नं. ५२) कचरू पठाण नावाच्या व्यक्तीने बेकायदेशीरपणे माती, दगड व मुरुम उत्खनन करून नेल्याचा आरोप करत धाराशिव पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन दिले आहे. जाब विचारण्यास गेल्यानंतर कचरू पठाणने ५-६ गुंडांच्या मदतीने कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
सौ. राठोड यांनी दिलेल्या निवेदनानुसार, त्या कचरू पठाण यांना त्यांच्या शेतातून माती, दगड, धोंडे , झाडे का घेऊन जात आहात, असे विचारण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी पठाण यांनी पाच ते सहा साथीदारांना सोबत आणून राठोड, त्यांचे पती व मुलांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला व जीवे मारण्याची धमकी दिली. हा सर्व प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला असल्याचा दावाही सौ. राठोड यांनी केला आहे.
या कामासाठी MH.14.JD 9894 क्रमांकाचा हायवा ट्रक आणि MH.CM 8837 (निवेदनातील उल्लेखानुसार) क्रमांकाची जेसीबी वापरण्यात आल्याचेही निवेदनात नमूद आहे. सौ. महानंदा राठोड यांनी पोलिसांना याप्रकरणी कचरू पठाण व त्याच्या साथीदारांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची विनंती केली आहे.
तिघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल
तुळजापूर तालुक्यातील इटकळ येथील रहिवासी सौ. महानंदा सुरेश राठोड यांच्या तक्रारीवरून, त्यांच्या शेतजमिनीतील माती उपसण्यास विरोध केल्याने शिवीगाळ, मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कचरू पठाण, रशीद पठाण आणि समीर शेख (सर्व रा. इटकळ) यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा (NCR) दाखल करण्यात आला आहे.,. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS2) संबंधित कलमांखाली (कलम 115(2), 352, 351(2), 3(5)) एच.एम.एन.सी. क्रमांक 198/2025 अन्वये नोंद केली आहे.
पोलिसांनी नोंदवलेल्या तक्रारीनुसार, १ एप्रिल रोजी सकाळी ११:३० वाजता सौ. राठोड (वय ४३) यांच्या शेतात आरोपी माती काढत होते. ‘कोणाला विचारून माती काढता?’ असे विचारले असता, आरोपींनी संगनमत करून ‘तू कशी शेतात येते?’ असे म्हणत शिवीगाळ केली व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, ‘तू कोणाला सांगायचे ते सांग’ असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.