धाराशिव – धाराशिव तालुक्यातील मौजे उपळा येथील अनुसूचित जातीतील कुटुंबाची वडिलोपार्जित शेतजमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे हडपण्याचा प्रयत्न केल्याच्या गंभीर आरोपांची दखल घेत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाने सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात तत्कालीन तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार ते अप्पर जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत अनेक महसूल अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला असून, त्यांच्या विभागीय चौकशीचे निर्देश छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहेत. तसेच, विभागीय आयुक्तांच्या स्थगिती आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे केलेले फेरफार रद्द करण्याचे आदेशही आयोगाने दिले आहेत.
काय आहे प्रकरण?
धाराशिव येथील स्वप्नील कालिदास व्हटकर आणि नितीन कालिदास व्हटकर या बंधूंनी राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, मौजे उपळा (ता. धाराशिव) येथील गट क्रमांक ७२०, ७२१ आणि ७२४ मधील त्यांची वडिलोपार्जित जमीन हडपण्यासाठी पंकज शिवाजी पडवळ, शुभांगी पंकज पडवळ आणि मेघराज पंकज पडवळ यांनी काही महसूल अधिकाऱ्यांशी संगनमत करून संघटित कट रचला.
व्हटकर बंधूंच्या आरोपानुसार:
- तत्कालीन तलाठी रेश्मा बी. पाटील यांनी खडकाळ आणि पडीक असलेल्या जमिनीवर नियमबाह्यपणे ऊस पिकाची हस्तलिखित नोंद ७/१२ उताऱ्यावर केली, ज्यामुळे जिरायत जमीन कागदोपत्री बागायत दाखवण्यात आली.
- चुकीच्या चतुःसीमा आणि बनावट स्वयंघोषणापत्राच्या आधारे तत्कालीन सह दुय्यम निबंधक अधिकारी वर्ग-२ (धाराशिव) यांच्या कार्यालयात १८ ऑगस्ट २०२२ रोजी बोगस खरेदीखत (दस्त क्र. ४८३६/२२ व ४८३७/२२) नोंदवण्यात आले.
- तत्कालीन मंडळ अधिकारी (येडशी/ढोकी) यांनी पंचनामा करताना जमीन खडकाळ व पडीक असल्याचे नमूद करूनही, अहवालात शब्दच्छल करून खरेदीदारांना फायदा होईल असा अहवाल तहसीलदारांना दिला.
- जिल्हाधिकारी कार्यालयातील तत्कालीन तहसीलदार (प्रवीण पांडे, अभिजित जगताप) यांनी तक्रारी करूनही जाणीवपूर्वक कारवाई टाळली.
- तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी शिरीष यादव (ज्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा गुन्हा दाखल आहे) यांनी अपिलामध्ये नियमबाह्य नोंदी आणि वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून खरेदीदारांच्या बाजूने निकाल दिला व जातीय द्वेषातून पदाचा गैरवापर केला.
- सर्वात गंभीर बाब म्हणजे, या प्रकरणातील फेरफार नोंदींना (क्र. ५३२३ व ५३२४) अप्पर विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांनी १७ डिसेंबर २०२४ रोजी स्थगिती दिली होती. असे असतानाही, २० आणि २३ जानेवारी २०२५ रोजी तलाठी प्रवीण भातलवंडे आणि मंडळ अधिकारी डी. डी. मुळक यांनी संगनमताने या नोंदी मंजूर करून खरेदीदारांची नावे ७/१२ उताऱ्यावर लावली.
व्हटकर बंधूंनी या सर्व प्रकरणात सामील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निलंबन करून त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा १९८९ व भारतीय न्याय संहिता २०२३ च्या संबंधित कलमांखाली तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
आयोगाची सुनावणी आणि निर्देश:
आयोगाचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) आनंदराव अडसूळ, उपाध्यक्ष अॅड. धर्मपाल मेश्राम आणि सदस्य अॅड. गोरक्ष लोखंडे यांच्यासमोर २९ जानेवारी २०२५ रोजी या प्रकरणाची सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी आपापले खुलासे सादर केले. मात्र, प्रकरणाचे गांभीर्य आणि कागदपत्रांतील त्रुटी लक्षात घेता आयोगाने खालील निर्देश दिले:
- विभागीय चौकशी: विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांनी या प्रकरणाशी संबंधित सर्व तत्कालीन व कार्यरत तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि अप्पर जिल्हाधिकारी यांची सखोल विभागीय चौकशी करावी.
- दस्त नोंदणीबाबत कारवाई: सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, धाराशिव यांनी खरेदीखत लिहून देणारे व घेणारे यांच्यावर उचित कारवाई करावी.
- फेरफार रद्द करणे: विभागीय आयुक्तांच्या स्थगिती आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे मंजूर केलेल्या फेरफार नोंदी (क्र. ५३२३/६९४० व ५३२४/६९३३) तात्काळ रद्द करून ७/१२ उतारा पूर्ववत करावा.
- अहवाल सादर करणे: केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल तात्काळ आयोगास सादर करावा.
आयोगाच्या या कठोर भूमिकेमुळे धाराशिव महसूल प्रशासनात खळबळ उडाली असून, आता विभागीय चौकशीत काय निष्पन्न होते आणि दोषींवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निर्णयामुळे जमीन हडपण्याच्या प्रयत्नांना चाप बसेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
या दहा जणांची होणार विभागीय चौकशी
१. श्रीमती. रेश्मा बी. पाटील (रेश्मा नेताजी धवन) तत्कालीन तलाठी, सज्जा -उपळा (मा.) ता. धाराशिव)
२. एन. डी. नागटिळक (तत्कालीन मंडळ अधिकारी, मंडळ अधिकारी कार्यालय ढोकी/ येडशी)
३. प्रवीण भातलवंडे, तलाठी, सज्जा -उपळा (मा.) ता. धाराशिव)
४. श्रीमती डी. डी. मुळुक (मंडळ अधिकारी, मंडळ अधिकारी कार्यालय, येडशी), ता व जि. धाराशिव
५. शिरीष यादव, उप जिल्हाधिकारी (निवडणूक) तथा अपर जिल्हाधिकारी (अतिरिक्त कार्यभार), धाराशिव
६. योगेश खरमाटे, तत्कालीन उपविभागीय अधिकारी, उपविभागीय अधिकारी, धाराशिव.
७. प्रवीण पांडे, तत्कालीन तहसीलदार, महसूल शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय. धाराशिव
८. अभिजित जगताप, तहसीलदार, महसूल शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय. धाराशिव
९. श्रीमती अर्चना मैंदर्गी, तत्कालीन नायब तहसीलदार, महसूल शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय. धाराशिव
१०.श्रीमती प्रियांका लोखंडे-काळे, नायब तहसीलदार, उपविभागीय अधिकारी कार्यालय, धाराशिव.