येरमाळा : मंडळी, कला आणि कलाकारांची कदर करण्यासाठी रसिक मायबाप कुठून कुठून येतात! याचंच एक ‘उत्कृष्ट’ उदाहरण कळंब तालुक्यातील चोरखळी गावात नुकतंच पाहायला मिळालं. इथं धाराशिव कारखान्याच्या कुशीत एक ‘कालिका कला केंद्र’ नावाचा जणू कलेचा महासागरच उभा आहे. पण थांबा! नावावर जाऊ नका. आत गेल्यावर कळतं की, कलेच्या नावाखाली डॉल्बीचा दणदणाट आणि त्यावर थिरकणाऱ्या काही महिला भगिनी आहेत. आणि त्यांच्या ‘कलेवर’ फिदा होऊन आंबटशौकीन मंडळी पैशांचा नुसता वर्षाव करतात म्हणे!
तर, अशा या ‘उच्च अभिरुचीच्या’ केंद्रात मंगळवारी रात्री दीड वाजता अकलूजहून खास ८-१० ‘कलोपासक’ आले होते. येताना बहुतेक त्यांनी ‘गंगाजल’ जरा जास्तच प्राशन केलं होतं, कारण केंद्रात पोहोचताच त्यांची कला थेट महिला भगिनींशी अश्लील चाळे करण्यापर्यंत पोहोचली.
आता साहजिकच, जिथे ‘कला’ तिथे गोंधळ! हा ‘सांस्कृतिक कार्यक्रम’ पाहून कोणीतरी येरमाळा पोलिसांना पाचारण केलं. एका धाडसी पोलीस उपनिरीक्षकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पण म्हणतात ना, ‘अति उत्साह अन्…’. या ‘कलाप्रेमीं’नी थेट खाकी वर्दीवरच हात साफ केला! साहेबावरच हात उगारला.
पण पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त! त्याच वेळी, जणू देवाचाच दूत यावा तसं, स्थानिक गुन्हे शाखेचं नाईट राऊंड पथक गस्तीवर होतं. गोंधळ ऐकून ते थांबले. त्यांनी मग या अकलूजच्या ‘रसिकांना’ असा काही ‘स्वागताचा आहेर’ दिला की त्यांची सगळी नशा एका मिनिटात उतरली. चार-पाच जणांना पोलिसांच्या गाडीत ‘सन्मानाने’ बसवण्यात आलं, तर बाकीचे वार्याच्या वेगाने पसार झाले.
आता खरी गंमत पुढे! पोलिसांना मारहाण होऊनही, महिलांवर अत्याचार होऊनही, अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही! महिला बिचाऱ्या भीतीने तक्रार द्यायला तयार नाहीत आणि ज्या उपनिरीक्षकांना मार बसला, तेही ‘शांतम् पापम्’ म्हणत गप्प बसले आहेत.
कारण? अहो, कानात सांगितलेली गोष्ट आहे, ही अकलूजची गँग म्हणे एका मोठ्ठ्या राजकीय नेत्याच्या खास मर्जीतली आहे! आता बोला! जिथे नेताजींचा वरदहस्त, तिथे पोलिसांचा काय पाड लागणार?
तर मंडळी, चोरखळीच्या या ‘कला केंद्रा’त सध्या कलेपेक्षा ‘पॉवर’चाच खेळ जास्त रंगलेला दिसतोय! बाकी तुम्ही सुज्ञ आहात!