धाराशिव – मोटरसायकल अंगावर घालण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाला आणि त्याच्या कुटुंबीयांना जमावाने मिळून बेदम मारहाण केल्याची घटना धाराशिव तालुक्यातील घाटंग्री येथे घडली आहे. याप्रकरणी १५ जणांविरुद्ध धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घाटंग्री येथील रहिवासी महादेव विठ्ठल देडे (वय २५) हे ९ एप्रिल २०२५ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास गावातील जिल्हा परिषद शाळेजवळ होते. यावेळी काही जणांनी त्यांच्या अंगावर मोटरसायकल घालण्याचा प्रयत्न केला. या कारणावरून वाद झाला असता, बापू चव्हाण, सचिन नवनाथ कांबळे, पुतळाबाई चव्हाण, लक्ष्मी सचिन चव्हाण (सर्व रा. धाराशिव) तसेच नवनाथ रामा कांबळे, दिपक युवराज कांबळे, भाग्यश्री दिपक कांबळे, शरद कालीदास कांबळे, महादेवी शरद कांबळे, हिरकणा युवराज कांबळे, राहुल युवराज कांबळे, कालीदास अभिमान कांबळे, मैनाबाई नवनाथ कांबळे, मिलींद नवनाथ कांबळे, ओंकार सचिन कांबळे (सर्व रा. घाटंग्री) यांनी गैरकायदेशीर जमाव जमवला.
आरोपींनी महादेव देडे यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्या, काठी, गॅसची रबरी पाईप, दगड, विटा आणि लोखंडी रॉडने जबर मारहाण करून जखमी केले. तसेच, महादेव यांचे आई-वडील आणि चुलत भाऊ भांडण सोडवण्यासाठी आले असता, आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करत लाथाबुक्क्या, गॅस पाईप आणि दगडाने मारहाण केली.
या घटनेनंतर महादेव देडे यांनी ११ एप्रिल २०२५ रोजी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी १५ आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), १२६(२), १८९(२), १९१(२), १९० अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.