वाशी – पूर्ववैमनस्यातून पाच जणांनी घरात घुसून एका महिलेला लोखंडी रॉडने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना वाशी तालुक्यातील बोरी येथे घडली आहे. आरोपींनी हल्ला करताना महिलेच्या गळ्यातील सुमारे पाच तोळे वजनाचे सोन्याचे गंठणही हिसकावून नेले आणि जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना ५ एप्रिल रोजी सकाळी घडली होती.
या प्रकरणी पीडित महिला सुवर्णा सुनिल पवार (वय ४५, रा. बोरी, ता. वाशी) यांनी ११ एप्रिल २०२५ रोजी वाशी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, ५ एप्रिल रोजी सकाळी सुमारे साडेआठ वाजण्याच्या सुमारास, रमाकांत प्रभाकर सानप, उमाकांत प्रभाकर सानप, राजकुमार तुकाराम सानप, मारुती तुकाराम सानप आणि प्रभाकर ज्ञानोबा सानप (सर्व रा. नांदगाव, ता. वाशी) यांनी मागील भांडणाचा राग मनात धरून, जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गैरकायदेशीर जमाव जमवला.
आरोपी सुवर्णा पवार यांच्या घरात घुसले आणि त्यांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी व लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. या हल्ल्यात सुवर्णा पवार गंभीर जखमी झाल्या. हल्लेखोरांनी यावेळी त्यांच्या गळ्यातील अंदाजे पाच तोळे वजनाचे सोन्याचे गंठण हिसकावून घेतले आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी देत निघून गेले.
सुवर्णा पवार यांच्या फिर्यादीवरून वाशी पोलिसांनी पाचही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९ (जीवघेणा हल्ला), ७६, ११९(१), ३३३ (लूट), ११५(२), ३५२, ३५१(२), १८९(१) (घरात घुसखोरी), १९१(२), १९० (धमकी देणे, जमाव जमवणे इत्यादी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.