धाराशिव – राज्यातील सर्वाधिक गाजत असलेल्या तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आज (१५ एप्रिल) मोठी कारवाई झाली आहे. धाराशिव येथील विशेष सत्र न्यायालयात पोलिसांनी तब्बल १० हजार पानी दोषारोपपत्र सादर केले असून, या प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया आता अधिक गतीने सुरू होणार आहे.
तपास अधिकाऱ्यांनी दोषारोपपत्रात नमूद केलेल्या प्रमुख बाबी खालीलप्रमाणे आहेत :
गुन्ह्याचा तपशील आणि पोलिस तपास
१४ फेब्रुवारी २०२५ रोजी तामलवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी प्रथम गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी केलेल्या तपासानंतर आज, गुन्हा घडून ६० दिवसांनी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
तपास अधिकारी गोकुळ ठाकूर यांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर करताना अनेक महत्वाच्या बाबींचा समावेश केला आहे. यात घटनास्थळाचे पंचनामे, आरोपींचे जबाब, कॉल डिटेल रेकॉर्ड्स (CDR), मोबाईल लोकेशन डेटा आणि इतर तांत्रिक पुरावे सादर करण्यात आले आहेत.
ड्रग्ज नेटवर्कचा विस्तार – पुणे, मुंबई, सोलापूरपर्यंत संबंध
या प्रकरणात केवळ तुळजापूर नव्हे, तर मुंबई, सोलापूर आणि पुणे या ठिकाणच्या ड्रग्ज नेटवर्कशी संबंधित धागेदोरे सापडल्याचे दोषारोपपत्रात नमूद आहे. त्यामुळे हे प्रकरण केवळ स्थानिक मर्यादेत नसून, राज्यव्यापी स्वरूपाचं असल्याचं स्पष्ट झालं आहे.

आरोपी आणि कारवाई
- एकूण ३५ आरोपींवर गुन्हा दाखल
- यापैकी १४ आरोपी सध्या अटकेत, तर २१ आरोपी अजूनही फरार
- पोलिसांनी ८० नागरिकांना नोटीसा देऊन चौकशीसाठी बोलावले होते
- फरार आरोपींपैकी काहींनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज देखील दाखल केले आहेत
राजकीय आणि सामाजिक पडसाद
या प्रकरणामुळे तुळजापूरसह संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. सामाजिक आणि राजकीय स्तरावर या घटनेची तीव्र प्रतिक्रिया उमटली असून, या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट), भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू आहे.
पुढील टप्पा – न्यायालयीन सुनावणीस गती
दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर आता या प्रकरणाची नियमित सुनावणी सुरू होणार असून, न्यायालयीन प्रक्रियेला अधिक वेग येण्याची शक्यता आहे.
या प्रकरणात राज्यातील आणखी मोठ्या मासे गळाला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांनी आता ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या प्रमुख नेटवर्क्सचा शोध घेण्याची दिशा स्पष्ट केली आहे.
तारखेनिहाय घटनाक्रम
- १५ फेब्रुवारी: तामलवाडी येथे कारमध्ये ४५ ग्रॅम ड्रग्ज (५१ पुड्या) आणताना तीन आरोपींना अटक करण्यात आली. यामध्ये काही जप्त केली. यात तुळजापूर येथील अमित आरगडे व देविदास दळवी तर तुळजापूर येथील संदीप राठोड यांना अटक करण्यात आली.
- २० फेब्रुवारी: आरोपींची संख्या पाचवर गेली. यामध्ये पोलिस तपासात ड्रग्ज पुरवठा करणारी मुंबईतील संगीता गोळे व तुळजापूर येथील स्वराज तेलंग याचे नाव समोर आले. पोलिसांनी २५ फेब्रुवारी रोजी महिलेस मुंबईतून ताब्यात घेतले.
- २२ फेब्रुवारी: काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी १९ जणांचा सहभाग असल्याचा आरोप केला. पोलिस तपासात कॉल डिटेल्सवरून ही नावे समोर आल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले.
- १ मार्च: म्होरक्या पिंटू मुळे याला पोलिसांनी अटक केली. त्याला २१ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
- २५ मार्च: पोलिस तपासात ड्रग्ज तस्करीतील आरोपींची संख्या १९ वर पोहचली. सुलतान शेख याला नळदुर्ग येथून तर जीवन साळुंखे याला सोलापुरातून ताब्यात घेतले. १९ पैकी सात आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
- २६ मार्च: आरोपींच्या संख्येत वाढ होत २५ वर पोहचली. यामध्ये राजकारणातील चंद्रकांत कणे, विनोद उर्फ पिंटू गंगणे, शरद जमदाडे यांची नावे समोर आली. २५ पैकी १२ आरोपी फरार घोषित करण्यात आले तर १३ जणांना अटक केली होती.
- १५ एप्रिल: तपास अधिकाऱ्यांकडून जिल्हा न्यायालयात १० हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल. यामध्ये 22 फरार तर 14 अटक असलेल्या आरोपींविरोधात माहिती देण्यात आली आहे.