परंडा – परंडा शहर आणि तालुक्यात ड्रग्स माफियांनी आपले जाळे पसरले असून, अमली पदार्थांची तस्करी मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा गंभीर मुद्दा माजी आमदार राहुल महारुद्र मोटे यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात त्यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन देत, या रॅकेटचा पर्दाफाश करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, या प्रकाराला आळा घालण्यासाठी बार्शी पोलिसांनी नुकतीच कारवाई करत परंडा येथील चार ड्रग्स पेडलरला अटक केली असून, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार हाजी मस्तान पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती समोर येत आहे.
माजी आमदार मोटे यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही महिन्यांपासून परंडा शहर आणि तालुक्यात एम.डी. ड्रग्स आणि इतर अमली पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ड्रग्स माफिया वेगाने सक्रिय झाले असून, त्यांच्यामुळे परंडा शहर आणि ग्रामीण भागातील युवा पिढी धोक्यात आली आहे. बार्शी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी यासंदर्भात कारवाई करत काही आरोपींना अटक केली असली, तरी ते पुरेसे नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. या ड्रग्स माफियांमुळे समस्या अधिक गंभीर बनली असून, यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
या गंभीर प्रकारची पोलीस प्रशासनाने स्वतः जातीने लक्ष घालून सखोल चौकशी करावी आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून त्यांचा बीमोड करावा, अशी मागणी मोटे यांनी केली आहे. जेणेकरून राज्याचे आणि देशाचे भविष्य असलेली तरुण पिढी या व्यसनाधीनतेपासून वाचू शकेल.
दरम्यान, या ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी बार्शी पोलिसांनी पावले उचलली असून, परंडा परिसरातून चार ड्रग्स पेडलरला अटक करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या चौकशीतून या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हाजी मस्तान असल्याचे समोर आले असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. हाजी मस्तानला अटक केल्यानंतर या ड्रग्स रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा खुलासा होण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे परंडा परिसरातील ड्रग्स माफियांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.