तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात दर्शनासाठी आलेल्या सात जणांना त्यांच्या संशयास्पद हालचालींमुळे तुळजापूर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. यामध्ये काही महिलांचाही समावेश आहे. हे सर्वजण सलग तीन दिवस मंदिरातील दर्शन मंडपाच्या तिसऱ्या मजल्यावर संशयास्पदरीत्या वावरताना आढळून आले होते, त्यामुळे त्यांच्या हेतूविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, ही घटना बुधवार, २३ एप्रिल ते शुक्रवार, २५ एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीत घडली.
पहिला दिवस (बुधवार, २३ एप्रिल):
सायंकाळी सुमारे ५:२७ ते ५:३४ च्या दरम्यान, दर्शन मंडपाच्या तिसऱ्या मजल्यावरील प्रवेशद्वाराजवळ चार ते पाच व्यक्ती संशयास्पद हालचाली करत असल्याचे सुरक्षा रक्षक शिवाजी उमाप, सुरक्षा फील्ड ऑफिसर विभिषण माने आणि सुरक्षा विभाग प्रोजेक्ट मॅनेजर संग्राम पाटील यांच्या निदर्शनास आले. हे अधिकारी नियमित तपासणी फेरीवर (राऊंड चेकिंग) असताना त्यांना हा प्रकार दिसला. सुरक्षा रक्षकांनी या व्यक्तींची चौकशी केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्यांना तेथे न थांबता, दर्शन झाले असल्यास तात्काळ मंदिर परिसर सोडण्यास सांगितले. खबरदारी म्हणून दोन सुरक्षा रक्षकांना त्यांच्यावर लक्ष ठेवण्यास पाठवण्यात आले. त्यानंतर त्या संशयित व्यक्ती धर्मदर्शन रांगेतून दर्शनासाठी गेल्या.
दुसरा दिवस (गुरुवार, २४ एप्रिल):
दुसऱ्या दिवशी, दुपारी सुमारे ३:४० ते ३:४८ च्या दरम्यान, त्याच व्यक्ती पुन्हा दर्शन मंडपाच्या तिसऱ्या मजल्यावरील प्रवेशद्वाराजवळ आढळून आल्या. यावेळी सुरक्षा विभाग फील्ड ऑफिसर बिभीषण माने, SISPL चे सुरक्षा निरीक्षक कमलाकर पवार आणि सुरक्षा रक्षक शिवाजी उमाप हे तपासणी फेरीवर असताना त्यांना या व्यक्ती दिसल्या. श्री. पवार यांनी त्यांना हटकले आणि तेथे थांबण्याचे कारण व त्यांची ओळख विचारली. मात्र, त्यांनी पुन्हा फिरवाफिरवीची उत्तरे दिली. त्यांना पुन्हा एकदा तेथे न थांबता मंदिराबाहेर जाण्यास सांगण्यात आले. या घटनेची तात्काळ माहिती मंदिर पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन चौधर आणि पोलीस कर्मचारी सोनटक्के यांना देण्यात आली.
तिसरा दिवस (शुक्रवार, २५ एप्रिल):
तिसऱ्या दिवशीही, सायंकाळी ४:५२ ते ५:०६ च्या दरम्यान, याच संशयित व्यक्ती मंदिर परिसरात वावरताना दिसल्या. सलग तीन दिवस एकाच ठिकाणी संशयास्पद वावर निदर्शनास आल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली. तात्काळ चार सुरक्षा रक्षकांच्या मदतीने (महिला सुरक्षा रक्षक शीतल केंद्रे, सविता माने आणि पुरुष सुरक्षा रक्षक हरिदास क्षीरसागर, रोहित सुरवसे) या सर्व सात संशयित व्यक्तींना ताब्यात घेऊन प्रथम मंदिर पोलीस चौकीत नेण्यात आले.
मंदिर पोलीस चौकीतील अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार, पुढील चौकशी आणि कारवाईसाठी या सातही जणांना (ज्यात महिलांचाही समावेश आहे) तुळजापूर शहर पोलीस चौकीत नेण्यात आले असून, त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलिसांकडून कसून चौकशी सुरू:
सलग तीन दिवस एका विशिष्ट ठिकाणी वारंवार येऊन संशयास्पदरीत्या वावरणाऱ्या या सात जणांचा नेमका उद्देश काय होता? ते केवळ दर्शनासाठी आले होते की त्यांचा काही वेगळा हेतू होता? या दृष्टीने तुळजापूर पोलीस आता त्यांची कसून चौकशी करत आहेत. या घटनेमुळे मंदिर परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.