धाराशिव: भारतीय जनता पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांची मुदत पूर्ण होण्याआधीच त्यांना बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. चालुक्य यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यास अजून अवधी शिल्लक असतानाच, नवीन जिल्हाध्यक्ष निवडीसाठी चाचपणी सुरू झाली आहे.
या पार्श्वभूमीवर, लातूरचे भाजप आमदार रमेश कराड यांनी १ मे रोजी धाराशिवला भेट देऊन पक्ष कार्यकर्त्यांशी चर्चा केली व परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन नव्या जिल्हाध्यक्षासाठी चाचपणी केली असल्याचे समजते.
सध्याचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. तसेच, पक्ष सदस्य नोंदणी अभियानही यशस्वीरित्या राबवण्यात आले. चालुक्य यांना जिल्ह्यातील सुमारे ७० टक्के कार्यकर्त्यांचा पाठिंबा असल्याचे बोलले जाते. मात्र, पक्षातील एका नेत्याला चालुक्य यांचे नेतृत्व मान्य नसल्याची चर्चा आहे. या नेत्याला आपल्या मर्जीतील कार्यकर्ता जिल्हाध्यक्षपदी हवा असल्याने हा बदल घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
संताजी चालुक्य हे बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या कार्यकाळात पक्षाने निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. असे असतानाही, मुदत पूर्ण होण्याआधीच अध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. आमदार रमेश कराड यांच्या भेटीनंतर आता पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार, संताजी चालुक्य यांना मुदतवाढ मिळणार की नव्या चेहऱ्याला संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.