तुळजापूर : अहो आश्चर्यम्! कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्राचा कायापालट करण्यासाठी तब्बल १८६६ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर झाल्याची गोड बातमी भाजपचे स्थानिक आमदार राणा पाटील यांनी फेसबुक लाईव्हद्वारे दिली आहे. ही बातमी ऐकून तुळजापूरकरांच्या मनात आनंदाचे उधाण आले असले तरी, काहींच्या भुवया मात्र ‘खरंच विकास होणार की फक्त घोषणांचा पाऊस?’ या शंकेने उंचावल्या आहेत.
आमदार राणा पाटील हे त्यांच्या ‘घोषणांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ’ या अनोख्या शैलीसाठी सुपरिचित आहेत. सन २०१९ पासून ते तुळजापूरचे आमदार असून, त्यापैकी तीन वर्षे तर ते सत्तेच्या मलाईदार खुर्चीवर विराजमान आहेत. विकासाचा ध्यास (!) मनी बाळगून त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून ‘तिरुपती देवस्थानच्या धर्तीवर विकास होणार’ हे गाजर ते जनतेला नियमितपणे दाखवत आहेत. आता कुठे या गाजराला मंजुरीचा कोंब फुटला आहे.
पण मंडळी, खरी मेख तर पुढेच आहे! निधी कधी येणार? आला तरी किती येणार? आणि विकासकामांचा नारळ कधी फुटणार? हे प्रश्न सध्या तुळजापूरच्या हवेत पिंगा घालत आहेत. याआधीही आमदार महोदयांनी पाच हजार कोटींचा विकासनिधी आणल्याचा डांगोरा पिटला होता. त्या हिशोबाने तर धाराशिव जिल्हा पॅरिस व्हायला हवा होता. पण गंमत बघा, देशातील मागास जिल्ह्यांच्या यादीत धाराशिवने तिसरा क्रमांक पटकावला! यालाच म्हणतात विकासगंगा उलटी वाहणे!
सध्या तरी जनता म्हणतेय, “विकासाची स्वप्ने दाखवताय ठीक आहे, पण आधी तुळजापूर नगरीला ड्रग्जमुक्त करा. सगळे अवैध धंदे बंद करा आणि मंदिरातला तो व्हीआयपी पासचा घोटाळा आवरा.” जोपर्यंत हे होत नाही, तोपर्यंत १८६६ कोटींच्या आकड्यावर विश्वास कसा ठेवायचा, हाच मोठा प्रश्न तुळजापूरकरांना पडला आहे.
आता तुळजापूरचा विकास होतो की फक्त निवडणुकीपुरता ‘स्टंट’ ठरतो, हे येणारा काळच ठरवेल. तोपर्यंत, आमदार राणा पाटलांच्या घोषणा आणि जनतेच्या प्रतिक्रिया यांवर आमचे लक्ष राहीलच!