तामलवाडी – शेतातील घरी एकटी असलेल्या ३२ वर्षीय महिलेवर गावातीलच एका तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना १९ मार्च २०२५ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत पीडितेने ७ मे २०२५ रोजी तामलवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, आरोपी तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (ॲट्रॉसिटी) गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला (नाव व गाव गोपनीय) १९ मार्च २०२५ रोजी दुपारी आपल्या शेतातील घरी एकटी असताना गावातील एक तरुण तेथे आला. त्याने महिलेवर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. तसेच, घडलेल्या प्रकाराची कोठे वाच्यता केल्यास जिवंत सोडणार नाही, अशी धमकीही दिली.
या घटनेमुळे भयभीत झालेल्या पीडितेने अखेर ७ मे २०२५ रोजी तामलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ६४ (लैंगिक अत्याचार), ३५१(२) (धमकी देणे), ३५१(३) (धमकी देणे) सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे कलम ३ (२) (व्हीए) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.