उमरगा : येथील हुतात्मा स्मारकाच्या गार्डनमध्ये झाडाखाली चिलीममधून गांजा ओढणाऱ्या दोघांना उमरगा पोलिसांनी शुक्रवारी, २३ मे २०२५ रोजी दुपारी रंगेहाथ पकडले. याप्रकरणी दोघांविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये (एन.डी.पी.एस. ॲक्ट) स्वतंत्र दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
उध्दव पांडुरंग पांचगे (वय ३७ वर्षे) आणि महेश कमलाकर वाडेकर (वय ३१ वर्षे, दोघे रा. हिप्परगा राव, ता. उमरगा) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर आरोपी हे काल (शुक्रवार, दि. २३ मे २०२५) दुपारी पावणे दोनच्या सुमारास उमरगा शहरातील हुतात्मा स्मारकाच्या गार्डनमध्ये एका झाडाखाली बसून चिलीममध्ये गांजा भरून त्याचे सेवन करत होते.
गस्तीवर असलेल्या उमरगा पोलिसांच्या निदर्शनास हा प्रकार आला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गांजा आणि चिलीम जप्त करण्यात आली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून, उध्दव पांचगे आणि महेश वाडेकर यांच्याविरुद्ध एन.डी.पी.एस. ॲक्ट १९८५ चे कलम ८ (सी) आणि २७ अन्वये उमरगा पोलीस ठाण्यात स्वतंत्र दोन गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.