तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दारी पुन्हा एकदा विकासाच्या घोषणांचा पाऊस पडला आहे. तब्बल १,८६५ कोटी रुपयांचा जम्बो विकास आराखडा राज्य सरकारच्या तिजोरीतून (कागदावर तरी!) मंजूर झाल्याची गोड बातमी ‘मित्र’चे उपाध्यक्ष आणि विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. नियोजन विभागाने प्रशासकीय मान्यतेचा शासकीय आदेश (जीआर) काढल्याने चालू आर्थिक वर्षापासूनच कामाला सुरुवात होणार असल्याचेही ते म्हणाले. अहो, पण हे तर दरवर्षीचंच झालंय की!
आमदारसाहेब गेल्या सहा वर्षांपासून तुळजापूरचे प्रतिनिधित्व करत आहेत, त्यातली अडीच वर्षे सोडली तर बाकी काळ सत्ता त्यांच्याच हाती किंवा साथीला होती. दर निवडणुकीच्या तोंडावर किंवा काहीतरी ‘मोठा’ कार्यक्रम असल्यावर तुळजापूरला तिरुपतीच्या धर्तीवर विकसित करण्याच्या घोषणा ऐकायला मिळतात. कधी थ्रीडी व्हिडीओतून चकचकीत विकास दाखवला जातो, तर कधी ‘कमिटी आली, पाहणी झाली, लवकरच मंजुरी मिळेल’ असे सांगितले जाते. आता तर थेट १८६५ कोटींची प्रशासकीय मान्यताच मिळाली! टाळ्या!
काय काय होणार म्हणतात या नव्या आराखड्यात?
- मुख्य दर्शन मंडप (याची गरज तर अनेक वर्षांपासून आहे!)
- आई तुळजाभवानी छत्रपती शिवरायांना तलवार देतानाचा १०८ फुटी पुतळा (भव्यदिव्य!)
- घाटशिळ, भक्तनिवास, प्रसादालय, पुस्तकालय, भोजनालय, वाहनतळ (यादी बरीच मोठी आहे!)
- वृंदावन गार्डनसारखं उद्यान, लिफ्ट, ट्रॅव्हलेटर (आधुनिक सोयींनी सुसज्ज!)
या सगळ्यासाठी २०२८ पर्यंतची मुदतही ठरवली आहे. प्राचीन वास्तूंची ऐतिहासिकता जपून, पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली काम होणार आहे, असंही सांगितलं आहे. म्हणजे सगळं काही ‘प्लॅन्ड’ आहे! जिल्हाधिकाऱ्यांना ‘संनियंत्रण अधिकारी’ म्हणून नेमलंय, म्हणजे कामाला वेग येणार, पारदर्शकता राहणार, अशी भाबडी आशा करायला हरकत नाही.
पण कळीचे मुद्दे अजून अनुत्तरितच!
आमदार पाटीलसाहेब, अभिनंदन! पण काही प्रश्नांची उत्तरं मिळतील का?
१. बजेट नक्की किती मंजूर झालं? म्हणजे, १८६५ कोटींच्या आराखड्याला मान्यता मिळाली, पण यावर्षी प्रत्यक्ष किती कोटी रुपये तिजोरीतून सुटणार आहेत? आकडा सांगाल का?
२. प्रत्यक्ष भूसंपादन कधी? ३०% तरतूद भूसंपादनासाठी आहे, शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळणार, हे सगळं ऐकायला छान वाटतं. पण जमीन मोजणी, नोटिसा आणि प्रत्यक्ष ताबा प्रक्रिया कधी सुरू होणार, याचा काही ‘शुभमुहूर्त’ आहे का?
३. फक्त स्वप्नं की प्रत्यक्ष काम? गेल्या अनेक वर्षांपासून तुळजापूरकर अशा घोषणा ऐकत आहेत. यावेळी तरी प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार की पुन्हा एकदा निवडणुका जवळ आल्यावर नवीन ‘अपडेटेड’ आराखडा पाहायला मिळणार?
१०८ फुटी पुतळ्याचा ‘भव्य’ घाट; पण तुळजापूरकरांचा का आहे तीव्र विरोध?
तुळजापूरच्या १८६५ कोटींच्या विकास आराखड्यातील एक प्रमुख आकर्षण म्हणजे आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार प्रदान करतानाचा १०८ फुटी भव्य पुतळा! कागदावर ही कल्पना निश्चितच रोमांचक आणि अभिमानास्पद वाटते. पण, याच पुतळ्याला तुळजापूरमधील स्थानिक नागरिक आणि भाविकांकडून तीव्र विरोध होत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
विरोधाची प्रमुख कारणं काय?
१. देवीच्या मूर्तीवरून वाद: आमदार राणा पाटील यांनी या प्रस्तावित पुतळ्याची जी काही संकल्पना चित्र किंवा ‘फोटोशॉप’ केलेली प्रतिमा जनतेसमोर आणली, त्यातील आई तुळजाभवानीची मूर्ती ही प्रत्यक्ष गर्भगृहातील मूर्तीपेक्षा वेगळी आणि काहीशी चुकीची असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. देवीच्या मूळ रूपाशी आणि परंपरेशी विसंगत मूर्ती उभारण्यास त्यांचा तीव्र आक्षेप आहे. त्यामुळे, “आमची आई भवानी तुम्ही फोटोशॉपमध्ये का बदलली?” असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
२. स्थानाची अडचण आणि भीती: हा भव्य पुतळा शहराबाहेर, डोंगराळ भागात उभारला जाणार असल्याचे समजते. यामुळे तुळजापूरमध्ये दर्शनासाठी मोठी गर्दी झाल्यास, अनेक भाविक मुख्य मंदिरात येण्याऐवजी बाहेरूनच या उंच पुतळ्याचे दर्शन घेऊन परत जातील, अशी एक ‘भाबडी’ (किंवा काहींच्या मते खरी) समजूत आणि भीती नागरिकांमध्ये पसरली आहे. यामुळे मंदिरातील गर्दी ओसरून त्याचे महत्त्व कमी होण्याची किंवा आर्थिक उलाढालीवर परिणाम होण्याची शक्यताही काहींना वाटते. “जर बाहेरच दर्शन होणार असेल, तर मूळ मंदिरात कोण येईल?” असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
थोडक्यात, विकासाला कोणाचा विरोध नाही, पण तो स्थानिकांच्या भावना, परंपरा आणि श्रद्धा यांना धक्का न लावता व्हावा, अशी माफक अपेक्षा आहे. पुतळ्याची भव्यता डोळे दिपवणारी असली तरी, त्यामागील भावना आणि पावित्र्य जपले जाणे अधिक महत्त्वाचे आहे, हेच या विरोधातून स्पष्ट होत आहे. लोकप्रतिनिधींनी या आक्षेपांची दखल घेऊन, सर्वांना विश्वासात घेऊनच पुढील पावले उचलावीत, हीच काळाची गरज आहे. अन्यथा, विकासाचा हा ‘भव्यदिव्य’ प्रकल्प नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडण्याचीच चिन्हे दिसत आहेत.
विकास हवाच, पण आधी हे तर बघा!
तुळजापूरचा विकास व्हावा, हे प्रत्येक भाविकाला आणि नागरिकाला वाटतंच. पण विकास म्हणजे फक्त मोठ्या इमारती आणि पुतळे नव्हेत. त्याआधी काही मूलभूत गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं नाही का, आमदारसाहेब?
- व्हीआयपी पास घोटाळा: देवस्थानातील व्हीआयपी पासचा सुळसुळाट आणि त्यातील कथित गैरव्यवहार कधी थांबणार? सामान्य भाविकांना दर्शन सुलभ कधी होणार?
- अवैध धंदे आणि ड्रग्ज: तुळजापूर नगरी ड्रग्ज आणि अवैध धंद्यांच्या विळख्यात सापडल्याच्या बातम्या कानावर येतात. काही ठिकाणी तर आपल्याच कार्यकर्त्यांची नावं चर्चेत असल्याचं बोललं जातं. या ‘विकासाला’ कधी आळा बसणार?
१८८५ कोटींचा आराखडा प्रत्यक्षात येवो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना. पण त्यासोबतच तुळजापूर खऱ्या अर्थाने ‘पवित्र’ आणि ‘सुरक्षित’ तीर्थक्षेत्र बनावं, ही अपेक्षा ठेवणं चुकीचं ठरू नये! नाहीतर विकासाच्या नावाने केवळ घोषणांचा धुरळा आणि जनतेच्या डोळ्यात विकासाच्या ‘फोटोशॉप’ केलेल्या प्रतिमा, हेच चित्र कायम राहील. बोला जगदंबे!