बेंबळी (धाराशिव): पतीसोबत वाद असल्याने वेगळे राहत असलेल्या एका २६ वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर पाच वर्षांहून अधिक काळ लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात गावातील एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला पतीसोबत होणाऱ्या सततच्या भांडणामुळे त्याच्यासोबत राहत नव्हती. आरोपी तरुणाने याच परिस्थितीचा गैरफायदा घेतला. त्याने पीडितेला लग्नाचे वचन देऊन आणि आमिष दाखवून १२ मार्च २०२० ते २२ मे २०२५ या कालावधीत तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार लैंगिक अत्याचार केले.
पीडितेने लग्नाबाबत विचारणा केली असता, आरोपीने तिला लग्नास व तिचा सांभाळ करण्यास नकार दिला. तसेच, ‘जर पोलिसात तक्रार केली तर तुला जिवंत ठेवणार नाही,’ अशी धमकीही दिली.
अखेरीस, पीडित महिलेने धाडस दाखवून १७ जून २०२५ रोजी बेंबळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ६९ (लग्नाच्या खोट्या वचनावर आधारित लैंगिक अत्याचार) आणि कलम ३५१ (२), (३) (धमकी देणे) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.