नळदुर्ग – तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग ,अणदूर, जळकोट, ईटकळ परिसरात गावठी हातभट्टी दारू मुबलक प्रमाणात विकली जात आहे. येडोळा तांडा – पाटील तांडा तसेच लोहगाव परिसरात हातभट्टीची दारू गाळप होत असल्याच्या बातम्या धाराशिव लाइव्हने यापूर्वी प्रसिद्ध केल्या आहेत. अखेर नळदुर्ग पोलिसांना जाग आली असून, दोन ठिकाणी छापेमारी करत ४६०० लिटर दारू उध्वस्त केली आहे.
येडोळा व लोहगाव गावाचे हद्दीत गावठी हातभट्टी दारु गाळण्याच्या भट्टया सुरु आहेत. अशी माहिती मिळताच नळदुर्ग पोलीस स्टेशनचे एक पथक व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांनी संयुक्तरित्या सदर छापा मारला असता, येडोळा व लोहगाव शिवारात इसम नामे- राजु धोंडीबा राठोड, वय 33 वर्षे, 2) संजय सिध्दु राठोड, वय 40 वर्षे, 3) जालींदर रेवण पवार, वय 50 वर्षे, 4) लक्ष्मी प्रकाश आडे सर्व रा. येडोळा, ता. तुळजापूर जि. धाराशिव हे सर्वजन 4,600 लि. गावठी दारु निर्मीतीचा आंबवलेले गुळमिश्रीत रासायनिकद्रव्य हे जवळ बाळगलेले मिळून आले.
यावेळी गावठी दारु निर्मीतीचा आंबवलेले गुळमिश्रीत रासायनिकद्रव्य हे नाशवंत असल्याने तो जागीच ओतून नाश करण्यात आला. सदर ओतून दिलेला मद्यार्क निर्मीतीचा द्रवपदार्थासह मद्यनिर्मीती साहित्य व जप्त मद्य यांची एकत्रीत किंमत अंदाजे 4,31,300 ₹ असुन वरील नमुद आरोपी यांचे विरुध्द नळदुर्ग पोलीस स्टेशन येथे गुरनं 550/2023, 551/2023, 552/2023 कलम 65(ई)(फ) महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक गोहर हसन, उपविभागीय पोलीस अधीकारी निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्गचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तायवाडे, सुरज देवकर, पोलीस उपनिरीक्षक संजय झराड, तसेच पोलीस ठाणे नळदुर्ग पोलीस अंमलदार, तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग धाराशिवचे पोलीस निरीक्षक . कवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंडे, पोलीस उपनिरीक्षक. पवन मुळे, यांचे पथकाने केली आहे