धाराशिव: व्हॉट्सॲपवर आलेल्या एका अनोळखी लिंकवर क्लिक करणे धाराशिवमधील एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. लिंकवर क्लिक करताच मोबाईल हॅक होऊन बँक खात्यातून दीड लाख रुपये लंपास झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या सायबर फसवणुकीप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोवर्धनवाडी येथील रहिवासी आदित्य पांडुरंग भालेराव (वय २३) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, ही घटना १९ एप्रिल २०२५ ते २० एप्रिल २०२५ दरम्यान घडली. आदित्य हे धाराशिव येथील रघुवीर बजाज शोरूममध्ये असताना त्यांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर (8830041593
) एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून (8714363657
) एक लिंक आली होती.
उत्सुकतेपोटी किंवा अनावधानाने आदित्य यांनी त्या लिंकवर क्लिक करताच त्यांचा मोबाईल फोन हॅक झाला. त्यानंतर सायबर चोरांनी त्यांच्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्यात परस्पर प्रवेश करून १,५०,००० रुपये काढून घेऊन त्यांची आर्थिक फसवणूक केली.
या घटनेनंतर आदित्य भालेराव यांनी ४ जुलै २०२५ रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात मोबाईल क्रमांक धारकाविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ (सी) व ६६ (डी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
सायबर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, नागरिकांनी व्हॉट्सॲप, मेसेज किंवा इतर कोणत्याही सोशल मीडियावर अनोळखी नंबरवरून आलेल्या किंवा संशयास्पद वाटणाऱ्या लिंकवर क्लिक करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.